सूर्यकांत वाघमारे / नवी मुंबई पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बहुचर्चित वॉक विथ कमिशनर अभियान प्रसंगी सुरक्षेसाठी अतिक्रमण हटविण्यासाठी उपलब्ध केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा उपयोग केला जात आहे. शहरातील अतिक्रमणांचा प्रश्न ऐरणीवर असताना ती हटविण्याऐवजी उपलब्ध मनुष्यबळ इतरत्र वळविण्याविषयी नाराजी व्यक्त होऊ लागली असून पोलीस आयुक्तांनीही याची दखल घेतली आहे. नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यातर्फे प्रत्येक शनिवारी विभागनिहाय वॉक विथ कमिशनर हा उपक्रम राबवण्यात येत आहे. अनेकदा त्याठिकाणी तक्रार मांडण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसोबत आयुक्तांचे शाब्दिक खटकेही उडत आहेत. अशा वेळी तक्रारदार नागरिकांवर दबाव टाकण्यासाठी आयुक्तांकडून पोलीस बळाचा वापर होत आहे. गतमहिन्यात घणसोली स्थानकाबाहेर झालेल्या उपक्रमा वेळी अशाच एका तक्रारदाराला पोलिसांकडून धक्के देऊन बाहेर काढले होते. त्या वेळी आयुक्तांनीच पोलिसांना तसे आदेश दिले होते. यामुळे पोलिसांची प्रतिमा मलीन होत आहे; परंतु वॉक विथ कमिशनर या पालिका आयुक्तांचा खासगी कार्यक्रम असल्याने स्थानिक पोलिसांकडून अधिकृत बंदोबस्त पुरवला जात नसल्याची बाब समोर आली आहे. मात्र पालिकेच्या विभाग अधिकाऱ्यामार्फत प्रत्येक उपक्रमाची माहिती पत्राद्वारे स्थानिक पोलिसांना देऊन बंदोबस्ताची मागणी करण्यात आल्याचे समजते. यामुळे अतिक्रमण विरोधी कारवाईवेळी बंदोबस्तासाठी राखीव असलेल्या विशेष पथकाच्या पोलिसांचा वापर वॉक विथ कमिशनरसाठी होत असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. अतिक्रमण विरोधी कारवाईदरम्यान वादाचे प्रकार झाल्यास परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांचे एक पथक पालिकेला पुरवण्यात आले आहे. त्यामुळे या पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा वापर केवळ अतिक्रमण विरोधी कारवायांसाठीच होणे अपेक्षित आहे. असे असतानाही पालिकेच्या वॉक विथ कमिशनर या खासगी उपक्रमासाठी राखीव पथकातील पोलिसांचा वापर होत असल्याचे दिसून येत आहे.ज्या वेळी काही वादाची शक्यता वाटत असेल, अशा वेळी स्थानिक पोलिसांकडून ठरावीक उपक्रमा वेळी केवळ एक ते दोन कर्मचारी यापूर्वी पुरवण्यात आले आहेत. अशा वेळी त्यांची जबाबदारी केवळ उपक्रमाच्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ न देणे इथपर्यंतची राहिलेली आहे. मात्र, मुंडे यांच्याकडून स्वत:च्याच उपक्रमासाठी जमलेल्या तक्रारदारांवर दबदबा निर्माण करण्यासाठी, अथवा वैचारिक हुज्जत घालणाऱ्यांना हकलण्यासाठी पोलिसांचा वापर होत असल्याचे दिसून येत आहे. याची तक्रार काहींनी पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे केल्याचे समजते. त्यामुळे मुंढे यांच्या वॉक विथ कमिशनरची पोलीस सुरक्षा हटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.पालिका आयुक्तांच्या खासगी कार्यक्रमात पोलिसांच्या अधिकाराचा गैरवापर केला जात असल्याची तक्रार काहींनी पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे केल्याचे समजते. त्यानुसार नगराळे यांनीही ‘वॉक विथ कमिशनर’ ला पुरवण्यात आलेल्या बंदोबस्ताचा आढावा घेण्याला सुरुवात केल्याचेही सूत्रांकडून समजते.
अतिक्रमणचा बंदोबस्त ‘वॉक विथ कमिशनर’साठी
By admin | Published: January 13, 2017 6:22 AM