नोकरीच्या पहिल्याच दिवशी आयुष्याचा शेवट; कोपरखैरणेतील हत्येचा उलगडा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 05:14 AM2019-10-09T05:14:14+5:302019-10-09T05:14:33+5:30
गर्दुल्ल्यांनी पैसे लुटण्यासाठी गयासागर मिश्रा (२३) या टॅक्सीचालकाची हत्या केल्याची घटना कोपरखैरणेत घडली आहे.
नवी मुंबई : टॅक्सीत प्रवासी म्हणून बसलेल्या दोघांनी चालकाला लुटण्याच्या प्रयत्नात त्याची हत्या केल्याची घटना कोपरखैरणेत घडली होती. त्यामध्ये मयत चालकाचा तो नोकरीचा पहिलाच दिवस होता असे समोर आले आहे. गोठीवली येथील नातेवाइकांकडे आश्रय मिळवल्यानंतर तो ओलाच्या टॅक्सीवर चालक म्हणून कामाला लागला होता.
गर्दुल्ल्यांनी पैसे लुटण्यासाठी गयासागर मिश्रा (२३) या टॅक्सीचालकाची हत्या केल्याची घटना कोपरखैरणेत घडली आहे. गयासागर मिश्रा याचा तो नोकरीचा पहिलाच दिवस होता, तो मूळचा मध्यप्रदेशचा राहणारा असून नोकरीसाठी नवी मुंबईत आला होता. त्यानुसार गोठीवली येथे राहणाऱ्या मामाकडे त्याने आश्रय मिळवला होता. त्यानंतर ओलाच्या टॅक्सीवर चालकाची नोकरी मिळवली होती.
नोकरीच्या पहिल्याच दिवशी रात्रपाळीवर असताना प्रवासी म्हणून बसलेल्या दोघांनी त्याची हत्या केली. त्याच्या हत्येप्रकरणी कोपरखैरणे पोलिसांनी पकडलेले आकाश नवघने व किरण चिकणे हे दोघेही अमली पदार्थ विक्रीत सक्रिय आहेत. हे दोघे सेक्टर ४ येथील आदर्श बार समोरून मिश्रा याच्या टॅक्सीत प्रवासी म्हणून बसले.
यानंतर त्यांनी सर्व्हिस रोडने गाडी नेण्यास सांगून अवघ्या ३०० मीटर अंतरावर एकांताच्या ठिकाणी त्याची हत्या करून मोबाइल व पैसे लुटून पळ काढला. ज्या ठिकाणी ही घटना घडली तो परिसर रात्रीच्या वेळी गुन्हेगारी टोळक्यांचा अड्डा बनत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्याकरिता महावितरणच्या उघड्या ट्रान्सफार्मर रूम, आडोशाच्या जागा तसेच मोकळी मैदाने वापरली जात आहेत, त्यामुळे नागरिकांनाही रात्रीच्या वेळी प्रवास करताना जीव मुठीत धरून घराबाहेर निघावे लागत आहे.