पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत एका पिढीचा अंत

By admin | Published: July 9, 2016 03:40 AM2016-07-09T03:40:02+5:302016-07-09T03:40:02+5:30

वाशीमधील धोकादायक इमारतींमध्ये १२ हजार नागरिक तीन दशके जीव मुठीत घेवून जगत आहेत. पुनर्विकासासाठी पाठपुरावा करत असताना आतापर्यंत ५० पेक्षा अधिक नागरिकांचा बळी

End of one generation waiting for redevelopment | पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत एका पिढीचा अंत

पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत एका पिढीचा अंत

Next

- नामदेव मोरे,  नवी मुंबई

वाशीमधील धोकादायक इमारतींमध्ये १२ हजार नागरिक तीन दशके जीव मुठीत घेवून जगत आहेत. पुनर्विकासासाठी पाठपुरावा करत असताना आतापर्यंत ५० पेक्षा अधिक नागरिकांचा बळी गेला. एका पिढीचा दुर्दैवी अंत झाल्यानंतरही शासकीय यंत्रणा लालफितशाहीमधून बाहेर येत नाही. अजून किती नागरिकांचे बळी गेल्यानंतर पुनर्बांधणीचा प्रश्न मार्गी लागणार, असा आर्त प्रश्न रहिवासी विचारू लागले आहेत.
‘लोकमत आपल्या दारी उपक्रमा’अंतर्गत वाशीमधील धोकादायक इमारतींमधील धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मुंबईतील झोपडपट्टी, चाळ व इमारतींमधील छोटे घर विकून नागरिकांनी नवी मुंबईमध्ये वाशी सारख्या महत्त्वाच्या विभागात घरे खरेदी केली. घर घेतल्यानंतर एक ते दोन वर्षांमध्येच त्यामध्ये गळती सुरू झाली. तेव्हापासून इमारतींच्या दुरूस्तीसाठी पाठपुरावा सुरू झाला. दुरूस्ती झाली नाहीच, परंतु या इमारती धोकादायक झाल्या. पालिकेने त्यांना धोकादायक घोषित करून नागरिकांना त्या खाली करण्याच्या नोटिसा दिल्या. जवळपास १५ वर्षे येथील नागरिक पुनर्बांधणीसाठी पाठपुरावा करत आहेत. अनेकांना मानसिक त्रास सुरू झाला. रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह व इतर अनेक गंभीर आजाराने ग्रासले. वारंवार पाठपुरावा करूनही हा प्रश्न सुटला नसल्यामुळे नैराश्य येवून अनेकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ५० पेक्षा जास्त नागरिकांचा रखडलेल्या पुनर्विकासामुळे बळी गेला आहे. नवी मुंबईमध्ये सर्वप्रथम राहण्यासाठी आलेल्या एक पिढीचा अंत झाला असून अजून किती जणांचा बळी गेल्यानंतर प्रशासन हा प्रश्न मार्गी लावणार, असा प्रश्न रहिवासी उपस्थित करत आहेत.
महापालिका प्रत्येक वर्षी धोकादायक इमारतींची यादी जाहीर करते. अशा इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना घरे खाली करण्यास सांगितले जात आहे. तुम्ही घरे खाली करा, नाहीतर आम्ही तुम्हाला बाहेर काढून इमारती पाडून टाकू असा इशारा दिला जात आहे. या इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी अडीच एफएसआय मिळविण्यासाठी तब्बल १५ वर्षे सरकार दरबारी शेकडो हेलपाटे घालावे लागले. वर्षानुवर्षे आश्वासनांवर बोळवण केली जात होती. निवडणुका आल्या की एफएसआयचा विषय चर्चेत येतो. निवडणुका संपल्या की मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये जीव मुठीत घेवून जगणाऱ्या नागरिकांच्या समस्येकडे कोणीही लक्ष देत नाही. शासनाने फेब्रुवारी २०१५ मध्ये अडीच एफएसआयचे धोरण मंजूर केले. परंतु अद्याप एकही प्रस्ताव मार्गी लागलेला नाही. धोकादायक इमारतींचे स्लॅब वारंवार कोसळू लागले आहेत. श्रद्धा, जेएन १, पंचरत्नसह अनेक सोसायटीमधील रहिवाशांनी घरे खाली केली आहेत.
श्रद्धा सोसायटीमधील रहिवासी तब्बल १६ वर्षे संक्रमण शिबिरामध्ये वास्तव्य करीत आहेत. एक पिढी संपली, दुसऱ्या पिढीला तरी स्वत:चे घर मिळणार का, अशी विचारणा रहिवासी करत आहेत.

रखडलेल्या पुनर्विकासाचे बळी
आर. कार्व्हलो, नारायण शिंदे, इसाक मनीकम, बनारसी पात्रे, रवींद्रनाथ नायर, भंडारीदेवी पालीवाल, शांतीबेन पटेल, लक्ष्मी नारायण म्हात्रे, मगन भालेराव व त्यांचे कुटुंब, राम स्वरथ सिंग, अनंत पाटील, सुरेश कुदळे, बसेरा, द्वारका कडू, आदम शेख, गिरीश सिंग, नजीर मोहमद, आशा हुले, गौतमकुमार दत्ता, शिखा दत्ता, केशव सोनावणे, नागेश कांबळे, सुनीलकुमार महेश्वरी, सखुबाई पोटे.

मृत्यू सत्र थांबविण्याची गरज
धोकादायक इमारत पडल्यानंतरच नागरिकांचे मृत्यू होणार नाहीत. अपघाताची कायम टांगती तलवार असल्यामुळे मानसिक ताण वाढून अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. इमारतींचा पुनर्विकास कधी होणार असा प्रश्न रहिवासी वारंवार विचारत आहेत. सिडको, महापालिका व शासनाकडेही पाठपुरावा करत आहेत. परंतु त्यांच्या प्रयत्नांना अद्याप यश येत नाही. नैराश्यामुळे व ग्रासलेल्या आजारामुळे ३० वर्षांपूर्वी येथे राहण्यासाठी आलेल्या नागरिकांचा मृत्यू होवू लागला आहे.

धोकादायक इमारती
सेक्टर १ : बी टाईप अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन बी १६, बी ३, बी ६, बी २, बी ५, बी १२, बी १, बी २७, बी १७, बी १८, बी ११, बी ८, बी ४, डी १, डी २, डी ३, डी ४, लोकमान्य टिळक मार्केट

सेक्टर २ : मेघराज, मेघदूत टॉकीज, सी २ टाईपच्या इमारत क्रमांक १, ४, ५, ३

सेक्टर ५ :
राष्ट्रीय कामगार रुग्णालय इमारत क्रमांक १, २, ३, ४

सेक्टर ९ : अवनी सहकारी गृहनिर्माण सोसायटी इ. क्र. ४७ ते ५८, श्रद्धा सोसायटी २२ ते ४४, एकता सोसायटी १ ते १८, कैलास सोसायटी १९ ते ४५, जय महाराष्ट्र ओनर्स असोसिएशन ३१ ते ४६, आशीर्वाद सोसायटी २, ४ ते १८, गुलमोहर सोसायटी ६४ ते ८१, एफ टाईप ओनर्स असोसिएशन

सेक्टर १५ : दत्तगुरू नगर सोसायटी बी १० मधील इमारत क्रमांक ३२, ३६, ५०, ५६, ४५

सेक्टर १४ : डॅफोडाईल सोसायटी, सोमेश्वर सोसायटी इमारत क्रमांक २९ ते ३२, ३५, ३७, २५, सिद्धिविनायक सोसायटीमधील इमारत क्रमांक १०, १७, १८, २१, २२, कुमकुम सोसायटी.

सेक्टर १६ : सी टू टाईपमधील इमारत क्रमांक १ ते १९

सेक्टर २६ : ओमकार सोसायटी ए १ ते ए २०, महाराष्ट्र को-आॅप हौसिंग सोसायटी इ. क्र. ६५ ते ११५, हॅपी होम सोसायटी डी ११६ ते १३९, प्रगती सोसायटी ई १४०, १६१, वसंत विहार सहकारी संस्था एफ १६२ ते १८३

Web Title: End of one generation waiting for redevelopment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.