११ वर्षांच्या दिव्यांशु सिंहने लिहिलेले इंग्रजी नाटक रंगभूमीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2020 11:42 PM2020-10-02T23:42:16+5:302020-10-02T23:42:38+5:30
सेव्हन लेटर्स आॅफ यु.एफ.ओ.: नाटक बच्चेकंपनीच्या भेटीला
मुंबई : आजकालची लहान मुले वाचन करत नाहीत, अशी नेहमी तक्रार केली जाते. मात्र अंधेरीतील दिव्यांशु सिंह या ११ वर्षांच्या मुलाने वाचनाच्या गोडीमुळे एक नाटक लिहून काढले आहे. ‘सेव्हन लेटर्स आॅफ यु.एफ.ओ.’ हे बालनाटक आता लवकरच रंगभूमीवर पाहायला मिळणार आहे. दिव्यांशु अंधेरी पश्चिम येथील भवन्सच्या ए.एच. वाडिया हायस्कूलमध्ये आठवीत शिकत आहे.
राम आणि शाम हे विरुद्ध प्रवृतीचे दोन विद्यार्थी योगायोगाने एका वेड्या शास्त्रज्ञाबरोबर गुप्त कामगिरीसाठी एकत्र येतात. ते त्या शास्त्रज्ञासोबत दिल्लीला जातात व तिथे त्यांची डॉ. डेव्हिड यांच्याशी भेट होते. त्यांचा असा विश्वास आहे की, परग्रहावरून येणारे एलियन हे अनेक वर्षांपासून पृथ्वीचे निरीक्षण करत आहेत. ते त्यांचे मेसेज डिकोड करून पृथ्वीवर ह्ल्ला करणार आहेत, हे त्यांच्या लक्षात येते. ते पृथ्वीला वाचवतात का? डॉ. फ्रँकेनस्टाईन आणि डॉ. डेव्हिड एलियनची भाषा डिकोड करू शकतात का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ‘सेव्हन लेटर्स आॅफ यु.एफ.ओ.’ या इंग्रजी बालनाटकातून मिळणार आहेत.
दिव्यांशुला लहानपणापासूनच वाचनाची गोडी होती. त्यामुळे त्याने कॉमिक्सपासून सुरुवात करून रामायण, महाभारतही वाचून काढले. पुढे तो रॉबिनहूडकडून सायन्स फिक्शनकडे वळला. त्याने भारत सासणे यांच्या बालकथाही वाचल्या. त्यांच्या ‘राम शाम आणि परग्रहावरचा माणूस’ या कथेने त्याला आकर्षित केले. पुढे सासणे यांची गाठ पडल्यावर त्यांनी त्याला या कथेवर नाटक होऊ शकेल असे सुचविले. २०१९च्या उन्हाळ्याच्या सुट्टीत दिव्यांशुने हे बालनाट्य लिहून काढले.
कराटे मास्टर, एक शेरलॉक होम्सचा फॅन, एक वेडा शास्त्रज्ञ, एक एलियनवर संशोधन करणारा संशोधक, एक निवृत्त लष्कर अधिकारी आणि एक कामातून गेलेला पत्रकार, असे सगळे मिळून एका गुप्त कामगिरीवर गेले. व त्यांनी पराग्रहावरून आलेल्या एलियनपासून पृथ्वीला कसे वाचवले? हे सांगणारे हे नाटक आहे. पुण्याच्या ‘बुक गंगा’ या प्रकाशनाने हे नाटक प्रकाशित केले आहे. २०२१च्या मे मध्ये हे नाटक रंगमंचावर येणार असून, या नाटकाचा मराठी, हिंदी आणि कानडी अनुवाद उपलब्द होणार आहे.