विष्णुदास भावे नाट्यगृहात नाटकाआधी घ्या वाचनाचा आनंद चहा-कॉफीसोबत वाचा पुस्तके : महापालिकेची अभिनव संकल्पना
By नारायण जाधव | Published: December 16, 2022 08:46 PM2022-12-16T20:46:46+5:302022-12-16T20:47:01+5:30
नाटक सुरू होण्यापूर्वीच्या फावल्या वेळेत नवी मुंबईतील नाट्यप्रेमींना आता वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात नाटकासोबत वाचनाचा आनंद घेता येणार आहे.
नवी मुंबई : नाटक सुरू होण्यापूर्वीच्या फावल्या वेळेत नवी मुंबईतील नाट्यप्रेमींना आता वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात नाटकासोबत वाचनाचा आनंद घेता येणार आहे. महापालिकेने या नाट्यगृहात छोटी लायब्ररी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच तिचे बांधकाम सुरू होणार असल्याची माहिती शहर अभियंता संजय देसाई यांनी दिली.
नाट्यगृहात तळमजल्यावर पूर्वी ज्या जागेवर कारंजे होते, तेथे ही लायब्ररी बांधण्यात येणार आहे. डासांचा त्रास वाढू लागल्याने महापालिकेने हे कारंजे काही वर्षांपूवी बंद केले होते. यामुळे तेथील रिकाम्या जागेवर लायब्ररी बांधून तिचा सदुपयोग केला जाणार आहे. या लायब्ररीत मराठी, हिंदी, इंग्रजीसह अन्य भाषेतील पुस्तके, मासिके ठेवण्यात येणार आहेत. शिवाय बाजूला चहा-कॉफीचा काउंटर राहणार आहे. यामुळे प्रेक्षकांना नाटक सुरू होण्यापूर्वीच्या फावल्या वेळेत चहा-कॉफीचे घोट घेता घेता वाचनाचा आनंद लुटता येणार आहे.
वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृह हे मध्यवर्ती ठिकाणी असून, आजूबाजूला इतर विविध हॉल आहेत. तेथे येणारे नागरिकही या लायब्ररीचा लाभ घेऊ शकतील, अशी संकल्पना यामागील आहे. एखाद्या नाट्यगृहात सुसज्ज लायब्ररी सुरू करण्याचा कदाचित हा राज्यातील पहिला प्रयोग असणार आहे. तळमजल्यावर दर्शनी भागातच लायब्ररी असल्याने परिसरातील आजूबाजूचे रहिवाशांनाही नाटक न पाहता येथे येऊन वाचनाचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी कोणतेही बंधन राहणार नाही.
२८ लाखांचे बजेट
या लायब्ररीवर २८ लाखांहून अधिक रक्कम खर्च करण्यात येणार आहे. याबाबतची निविदाप्रक्रिया सुरू केली असून, लवकरच आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या संकल्पनेनुसार येथे सुसज्ज लायब्ररी बांधून एक वेगळा प्रयोग महापालिका राबविणार असल्याचे शहर अभियंता संजय देसाई यांनी स्पष्ट केले.