- नारायण जाधवलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : राज्याच्या ७२० किमीच्या समुद्रकिनारपट्टीवर लवकरच बंदर विकासासह विविध उद्योगांची उभारणी दिसणार असून, त्यांच्या विकासासाठी जलवाहतूक, रो-रो सेवा आणि फ्लोटेल्स, हाउसबोट्स, सीप्लेन, पाण्यावर धावणाऱ्या बसचा आनंद लुटता येणार आहे. याशिवाय पर्यटकांना समुद्र भ्रमणासह मनोरंजनासाठी मासेमारी करता येणार आहे. महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाने यासाठी पुढाकार घेतला आहे.
महाराष्ट्रातील किनारपट्टीवर उपरोक्त क्षेत्रात सेवा देण्यासाठी जे इच्छुक आहेत, अशा उद्योजकांकडून मेरी टाइम बोर्डाने ११ जानेवारी २०२४ पर्यंत स्वारस्य देकार मागविले आहेत.महाराष्ट्राला ७२० किलोमीटरची समुद्रकिनारपट्टी लाभलेली आहे. यामुळे राज्यात सागरी विकासाची प्रचंड क्षमता आहे. आजघडीला राज्यात दोन प्रमुख बंदरांसह ४८ छोटी बंदरे आहेत. यामुळे येथील सागरी संसाधनांचा लाभ उठवून राज्याच्या आर्थिक वृद्धीसाठी राज्य शासनाने हे उद्योग सुरू करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. यातून नोकऱ्या निर्माण करण्याबरोबरच किनारपट्टीचा विस्तार हा केवळ पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक करण्यासाठीच न करता त्या भागातील नागरिकांची सामाजिक-आर्थिक प्रगती साधणे हा उद्देश हे उद्योग सुरू करण्यामागे आहे.
बेलापूर जेट्टीवरून पर्यटकांची ने-आणनवी मुंबईतील नियोजित ‘फ्लोटेल’वर पर्यटकांची ने-आण बेलापूर जेट्टीवरून केली जाणार आहे. या जेट्टीचा वापर लवकरच मुंबई-नवी मुंबईसह ठाणे-कल्याण-मीरा-भाईंदर-वसईपर्यंतच्या जलवाहतुकीसाठीही होणार आहे. यामुळे महामुंबईतील पर्यटकांना नवी मुंबईतील या ‘फ्लोटेल’चा लाभ घेणे सोपे हाेणार आहे.
नवी मुंबईतही उभारणार फ्लोटेल सागरी पर्यटनाला चालना देण्यासाठी नवी मुंबईत हे ‘फ्लोटेल’ उभारले जाणार आहे. गेल्यावर्षीच यासाठी निविदा मागविल्या होत्या. कारण या परिसरात लवकरच आंतरराष्ट्रीय विमानतळ आकार घेत आहे. सी लिंकच्या उभारणीमुळे दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई शहर एकदम जवळ येणार आहे. याच परिसरात जगप्रसिद्ध घारापुरी लेणींसह बेलापूर किल्ला, जेएनपीटी, गेटवे ऑफ इंडिया, रेवस मार्गे अलिबाग जोडले जाणार आहेत. यामुळे ‘फ्लोटेल’ उभारण्यासाठी नवी मुंबईतील बेलापूर-उलवे खाडीची निवड केली आहे.
हे उद्योग सुरू करणारयात प्रामुख्याने कॅप्टिव्ह जेट्टी, शिपयार्ड, जहाज दुरुस्ती, जहाजांचा पुनर्वापर, मरिना विकसित करणे, रो-रो / रो-पॅक्स फेरी सेवा सुरू करणे, कोस्टल शिपिंगला चालना देणे, बंदराच्या विकासासाठी आवश्यक अशा औद्योगिकीकरण वाढविण्यासह जलवाहतूक, फ्लोटेल्स, हाउसबोट्स, सीप्लेन, पाण्यावर धावणाऱ्या बस सुरू हाेतील. याशिवाय पर्यटकांना समुद्र भ्रमणासह मनोरंजनासाठी मासेमारीचा आनंद घेता येणार आहे.