कळंबोली : दिवाळीची चाहूल लागल्याने पनवेल परिसरातील बाजारपेठा फुलल्या आहेत. दिवाळीत आर्थिक बाजू भक्कम होईल, असा आशावाद व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे. पनवेल परिसरात कोरोनामुळे व्यापारी वर्गातील आर्थिक बाजू पूर्णपणे ढासळली आहे. कोट्यवधी रुपयाचा माल खरेदी करून ठेवला. मात्र, कोरोनामुळे सर्व ठप्प झाले होते. त्यामुळे आर्थिक कंबरडे मोडले. काही व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानदारीचा गाशा गुंडाळला. लाखो रुपयांचा तोटा सहन करूनही व्यापाऱ्यांना दिवाळीची आस लागली आहे. जून महिन्यापासून मार्केटमधील परिस्थिती हळूहळू सुधारू लागली आहे. दसरा सणात व्यापऱ्यांना थोडा-फार दिलासा मिळाला. आता दिवाळीची चाहूल लागली आहे. नागरिक खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी करू लागल्याने व्यापारी वर्गात आनंदी वातावरण निर्माण झाले आहे. बाजारात कपडे खरेदीला उधाण आले आहे. त्याचबरोबर, घरातील इतर साहित्य खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. खरेदीसाठी बाजारपेठेत सकाळ-संध्याकाळ मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे.
आकाश दिव्यांच्या किमतीत वाढकळंबोली, कामोठे, पनवेल, नवीन पनवेल बाजारपेठेत आकाश कंदील आणि रोषणाई दिवे यांची दुकाने सजली आहेत. मालाची आवक कमी झाल्याने यंदा शंभर ते दीडशे रुपयांच्या आकाश दिव्यांच्या किमतीत वाढ झाली आहे. चिनी मालाची विक्री बाजारात बंद असल्याने रोषणाईसाठी लागणाऱ्या लायटिंगच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.