नवी मुंबई : दीड महिन्याच्या उन्हाळी सुटीला पूर्णविराम मिळून नवीन शैक्षणिक वर्षाला सोमवारपासून सुरुवात झाली. शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला शाळेचा हा पहिला दिवस आठवणीतला दिवस म्हणून जपता यावा यासाठी नवी मुंबईतील सर्वच शाळांच्या वतीने प्रवेशोत्सव साजरा करून विद्यार्थ्यांचे दणक्यात स्वागत केले. सकाळी पावसाने लावल्याने हजेरीमुळे विद्यार्थी आणि पालकांचा काहीसा गोंधळ उडाला तर काही विद्यार्थ्यांनी पावसात भिजत शाळा गाठली.पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शाळांना आजपासून सुरुवात झाली. विद्यार्थ्यांच्या किलबिलाटामुळे पहिल्याचदिवशी सीबीडीमधील भारती विद्यापीठ शाळेतील शिक्षकांनी स्वत: शाळेच्या प्रवेशद्वारात उभे राहून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. शाळेतील प्रत्येक वर्ग, नोटीस बोर्ड, वर्गातील फळे सजविण्यात आले होते. नेरुळ येथील तेरणा विद्यालयातही विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. शाळेची इमारत फुग्यांनी सजविली होती, प्रत्येक वर्गशिक्षकांनी आपआपल्या वर्गातल्या मुलांचे स्वागत केले. मोठ्या वर्गातील मुलांना उन्हाळी सुट्यांमध्ये काय मौजमजा केली या विषयावर निबंध लिहिण्यास सांगितला होता. वाशी येथील सेंट लॉरेन्स शाळेत विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांसाठी मनोरंजनात्मक खेळ, शिक्षकांशी ओळख करण्यासाठी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. करावे येथील ज्ञानदीप प्राथमिक शाळेतही विद्यार्थ्यांना चॉकलेट आणि पुष्प देऊन शाळेतील शिक्षकांनी स्वागत केले. कोपरखैरणे येथील तेरणा विद्यालयात शाळेचा पहिला दिवस पुस्तक दिन म्हणून साजरा करण्यात आला. या प्रसंगी पुस्तके आणि खाऊ यांचे वाटप करण्यात आले. सेवा सहयोग फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच दप्तरांचे वाटप करण्यात आले. सर्वच शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गोड खाऊ देण्यात आला. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गोड शिरा देण्यात आला. (प्रतिनिधी)शाळेचा पहिला दिवस हा विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या आठवणीतला दिवस ठरतो. आज पहिल्या दिवशीविद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचा पहिला दिवस अतिशय आनंदात गेला. विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. - हिना समानी, मुख्याध्यापिका, तेरणा विद्यालय नेरूळउन्हाळी सुटीनंतर आजपासून शाळा सुरू झाल्या त्यामुळे या मधल्या कालावधीत अगदी शांत वातावरण असलेल्या शाळेत पुन्हा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने उत्साहपूर्ण वातावरण तयार झाले. प्रत्येक विद्यार्थ्याला आपण या शाळेचा महत्त्वाचा हिस्सा आहोत ही भावना निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले. मुलांबरोबरच शिक्षकांनीही पहिला दिवसाचा आनंद घेतला. या पहिल्या दिवसाच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.- सायरा केनेडी, मुख्याध्यापिका सेंट लॉरेन्स हायस्कूल, वाशी
प्रवेशोत्सव जल्लोषात!
By admin | Published: June 16, 2015 12:59 AM