आरटीईअंतर्गत प्रवेशपत्र वाटपात दिरंगाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 11:55 PM2019-04-18T23:55:58+5:302019-04-18T23:56:01+5:30

आरटीईअंतर्गत शालेय प्रवेशप्रक्रियेच्या पहिल्या यादीत पात्र ठरलेल्या पाल्यांना प्रवेशपत्र मिळण्यास विलंब होत आहे.

Entry payments under RTE delayed | आरटीईअंतर्गत प्रवेशपत्र वाटपात दिरंगाई

आरटीईअंतर्गत प्रवेशपत्र वाटपात दिरंगाई

Next

नवी मुंबई : आरटीईअंतर्गत शालेय प्रवेशप्रक्रियेच्या पहिल्या यादीत पात्र ठरलेल्या पाल्यांना प्रवेशपत्र मिळण्यास विलंब होत आहे. यामुळे प्रवेशासाठी पात्र ठरूनही प्रक्रियेतील विलंबामुळे अपात्र ठरण्याची चिंता पालकांना सतावत आहे. त्यामुळे संतप्त पालकांनी गुरुवारी वाशीतील सहायता केंद्राबाहेर संताप व्यक्त केला.
नुकत्याच पार पडलेल्या आरटीईअंतर्गत प्रवेश प्रक्रियेची पहिली यादी घोषित झाली आहे. यामध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची आवश्यक कागदपत्रे आरटीई सहायता केंद्रात जमा केली जात आहेत. त्यानंतर संबंधित विद्यार्थ्याला प्रवेशपत्र मिळाल्यानंतर पुढील प्रक्रियेअंती संबंधित शाळेत त्याचा प्रवेश निश्चित होणार आहे. त्यानुसार वाशीतील पालिकेच्या शाळा क्रमांक २८ मध्ये कागदपत्रे जमा करण्यासाठी पालकांच्या रांगा लागत आहेत. मात्र, आठवड्यापूर्वी ज्यांनी कागदपत्रे जमा केली आहेत, त्यांना प्रवेशपत्र देण्यात विलंब होत आहे. पात्र विद्यार्थ्यांची संख्या तीन हजारांच्या आसपास असून प्रवेशपत्र मात्र प्रतिदिन सुमारे शंभर ते दीडशे विद्यार्थ्यांची दिली जात असल्याचा पालकांचा आरोप आहे. अशातच सलग येणाऱ्या सुट्यांमध्ये कार्यालय बंद असते. त्यामुळे प्रवेशपत्र मिळण्यास होणाºया विलंबामुळे अनेक विद्यार्थी यादीत नंबर लागूनही प्रवेशासाठी अपात्र ठरण्याची चिंता व्यक्त होत आहे.
वाशीतील सहायता केंद्राबाहेर मोठ्या संख्येने गर्दी करून पालकांनी असंतोष व्यक्त केला. या वेळी तिथल्या कर्मचाऱ्यांसोबतही काहींचा वाद झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. मात्र, केवळ खासगी शाळांच्या फायद्यासाठी प्रवेशपत्र वाटपात विलंब केला जात असल्याचा आरोप नितीन नाईक या पालकांनी व्यक्त केला. प्रशासनाने सर्व विद्यार्थ्यांना लाभ मिळावा या उद्देशाने केंद्र वाढवावेत, अथवा प्रक्रिया गतिशील करावी, अशी मागणी यावेळी पालकांनी केली.
अनेकदा त्याठिकाणी चौकशीसाठी गेलेल्या पालकांसोबत संवाद साधण्यात कर्मचारी टाळाटाळ करतात. त्यांच्याकडून सुरक्षा रक्षकामार्फतच पालकांपर्यंत मोघम माहिती पोहचवली जात असल्याचाही पालकांचा आरोप आहे. त्यामुळे आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेतील घोळाचा मनस्ताप पालकांना सहन करावा लागत आहे.

Web Title: Entry payments under RTE delayed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.