पनवेल : पर्यावरण रक्षण ही कोणत्या संस्थेची अथवा प्रशासनाची जबाबदारी नसून, याकरिता समाजातील सर्वच घटकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. सध्याच्या घडीला प्रदूषणाचा वाढता धोका लक्षात घेता नागरिकांनी आपल्या मानसिकतेमध्ये बदल करून पर्यावरणाला हानिकारक गोष्टी टाळणे गरजेचे असल्याचे आयुक्त गणेश देशमुख यांनी स्पष्ट केले. पिल्लई कॉलेजमध्ये आधुनिक तंत्रज्ञान विरहित प्लॅस्टिक क्रशर मशिनच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
पर्यावरणाला हानिकारक गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. याकरिता प्लॅस्टिकच्या पिशव्यांवरही शासनाने बंदी घातली आहे. नागरिकांनी स्वत: प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर टाळला पाहिजे. भारतातीत नागरिक परदेशात जातात, त्या वेळी त्या देशातील नियमांचे तंतोतंत पालन करीत असतात. मात्र, भारतात आल्यावर नियम पाळण्याच्या बाबतीत उदासीनता दाखविली जाते. हे कुठेतरी थांबण्याची गरज असून याकरिता आपल्या मानसिकतेमध्ये बदल करणे गरजेचे आहे. पिल्लईमध्ये बसविण्यात आलेल्या या प्लॅस्टिक क्रशर मशिनच्या उपक्रमाचे आयुक्तांनी स्वागत केले. मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक कचरा तयार होत असतो, अशा सोसायट्यांनी अशाप्रकारे प्लॅस्टिक क्रशर मशिन आपल्या सोसायटीत बसविणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्याच्या घडीला प्लॅस्टिकच्या बॉटल्सचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. अशा वेळी या बॉटल्स क्रश केल्यास त्यांचा पुनर्वापर प्रक्रिया लवकरात लवकर करता येते. या मशिनच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला डॉ. के. एम. वासुदेवन पिल्लई, डॉ. प्रियम पिल्लई, डॉ. संदीप जोशी, डॉ. निवेदिता श्रेयंस, अभिजीत दाते, विश्वजित पांडा आदीसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्लॅस्टिक बॉटल क्रश करा, पाच रुपये मिळवाविद्यार्थ्यांच्या मार्फत शीतपेय अथवा पाणी पिण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकच्या बॉटल्सचा वापर होत असतो. अशा वेळी पिल्लई महाविद्यालयात बसविण्यात आलेली ही अत्याधुनिक मशिन केवळ बॉटल्स क्रश करीत नाही, तर या मशिनमध्ये संबंधितांनी आपला मोबाइल नंबर टाकल्यास प्रत्येक बॉटल्स मागे पाच रुपये संबंधिताला पेटीएमद्वारे त्वरित मिळतात.