विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा -हास
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 11:14 PM2019-03-04T23:14:43+5:302019-03-04T23:14:51+5:30
विकासाच्या नावाखाली उरणमधील पर्यावरणाचा -हास सुरू झाला आहे.
- नामदेव मोरे
नवी मुंबई : विकासाच्या नावाखाली उरणमधील पर्यावरणाचा -हास सुरू झाला आहे. भराव टाकून होल्डिंग पाँड, पाणथळ जमीन व मँग्रोज नष्ट केले जात आहेत. यामुळे खाडीचे पाणी गावांमध्ये घुसू लागले आहे. वेळेमध्ये अतिक्रमण थांबविले नाही तर भविष्यात उरण परिसर पाण्याखाली जाण्याची भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.
उरणमधील कुंडे गावामध्ये फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पुराचे पाणी गावामध्ये शिरले. २५ पेक्षा जास्त घरांमध्ये पाणी शिरले. उन्हाळा सुरू होत असताना गावामध्ये पूरसदृश स्थिती झालेली पाहून सर्वांनीच चिंता व्यक्त केली आहे. श्री एकवीरा आई प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेने यापूर्वी उरण तालुक्यामध्ये कधी पूर आला होता याची माहिती तहसीलदारांकडे मागितली होती. गत १५ वर्षांमध्ये या परिसरामध्ये पूर आला नसल्याचे लेखी उत्तर त्यांना देण्यात आले आहे. पावसाळ्यामध्येही परिसरामध्ये पाणी भरत नसेल तर मग उन्हाळ्यामध्ये गावामध्ये पाणी घुसण्याचे कारण काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. संपूर्ण तालुक्यामध्ये व विशेषत: एसईझेड परिसरामध्ये रोज हजारो डम्परमधून भराव करण्याचे काम सुरू असल्यामुळेच ही स्थिती उद्भवू लागली आहे. परिसरामधील मँग्रोजचे जंगल नष्ट केले जात आहे. पाणथळ परिसरामधील पक्ष्यांच्या आश्रयस्थानांवरही डेब्रिजच्या टेकड्या तयार होत आहेत. भरतीचे पाणी वसाहतीमध्ये घुसू नये यासाठीच्या होल्डिंग पाँडचे अस्तित्वही नष्ट होत आहे. या सर्वांमुळे निसर्गाचा समतोल ढासळू लागला आहे. यावर्षी कुंडेमध्ये पाणी शिरले. अशीच स्थिती राहिली तर भविष्यात उरण परिसरामध्ये वाढणाऱ्या नागरी वस्तीमध्ये व गावांमध्ये समुद्राचे पाणी जाऊन जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांनी निसर्गाचा ºहास करणाऱ्यांविरोधात मोहीम सुरू केली आहे. नेचर कनेक्ट, श्री एकवीरा आई प्रतिष्ठान, पारंपरिक मच्छीमार बचाव कृती समिती यांनी अनेक महिन्यांपासून महसूल विभाग, सिडको, जेएनपीटी व थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पत्रव्यवहार सुरू केला आहे.
भराव टाकून निसर्गाचा ºहास सुरू असल्याच्या ठिकाणांची छायाचित्रे काढून तीही शासनाकडे पाठविली आहेत. अनेक लेखी तक्रारी केल्या आहेत. उच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या मँग्रोज सेलकडेही पाठपुरावा सुरू केला आहे, परंतु प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्य होत नाही. अप्रत्यक्षपणे भराव करणाऱ्यांना पाठीशी घातले जात आहे. सिडको व संबंधित संस्था कुठे व कशासाठी भराव केला जात आहे याचीही काहीच माहिती देत नाहीत.
कुंडेगावामध्ये उन्हाळ्यामध्ये घुसलेल्या पाण्यामुळे पर्यावरणप्रेमींनी पुन्हा मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली आहे.
>महत्त्वाचे प्रकल्प उरणमध्ये
देशातील प्रमुख बंदरापैकी एक असलेले जेएनपीटी या परिसरामध्ये आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरू आहे. उरणपर्यंत रेल्वे प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. यामुळे बांधकाम व्यवसायालाही गती मिळाली आहे. एसईझेड परिसरामध्येही बांधकामे सुरू आहेत. विकास ज्या गतीने सुरू आहे त्याच गतीने पर्यावरणाचा ºहास सुरू झाला आहे.
परिणामांचा अभ्यास नाही
उरण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात भरावाची कामे सुरू आहेत. भराव करण्यापूर्वी या परिसराचा इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट तयार करण्यात आलेला नाही. भरावाचा समुद्राच्या पाण्याच्या पातळीवर किती परिणाम होणार आहे याविषयी काहीही अभ्यास अद्याप झालेला नसल्याची माहिती पर्यावरणप्रेमींनी दिली आहे. तक्रारी आल्या की फक्त चौकशीचे आश्वासन दिले जात आहे. प्रत्यक्षात कोणावरच ठोस कारवाई होत नाही.
>उरणमध्ये ज्या परिसरात १५ वर्षातील अतिवृष्टीमध्येही पूर आला नव्हता त्या ठिकाणी उन्हाळ्यात घरांमध्ये पाणी जाऊ लागले आहे. विकासाच्या नावाखाली मँग्रोज नष्ट केले जात आहेत. निसर्गाच्या रक्षणासाठी लढा सुरू केला असून मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार केली आहे.
- बी. एन. कुमार, संचालक, नेचर कनेक्ट
>उरणमधील भरावाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. फेब्रुवारीमध्ये २५ घरांमध्ये समुद्राचे पाणी शिरले. खाडीकिनाºयावरील मँग्रोज,पक्ष्यांचे आश्रयस्थानही नष्ट केले जात आहेत. तक्रारी करूनही प्रशासन ठोस कारवाई करत नाही. शासनाकडेही पाठपुरावा सुरू केला आहे.
- दिलीप कोळी, सदस्य, पारंपरिक मच्छीमार बचाव कृती समिती