अलिबाग : समाजातील गरजू महिलांमध्ये शिवण कौशल्य विकसित करून, त्यांना रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांना स्वयंपूर्ण करीत असतानाच, पर्यावरणास घातक प्लॅस्टिकच्या पिशव्यांना आळा घालण्याकरिता या महिलांकडूनच कापडी पिशव्या शिवून घेऊन,पर्यावरणप्रेमींच्या सहयोगातून या कापडी पिशव्यांचे वितरण संपूर्ण जिल्ह्यात करण्याचा अनोखा उपक्रम आहे, तर महिला रोजगार विकासातून पर्यावरण संरक्षणाचा महत्त्वपूर्ण हेतू साध्य करण्याचा आदर्शवत उपक्रम असल्याचे प्रतिपादन येथील पर्यावरणप्रेमी भारत तन्ना यांनी केले आहे.मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाशी संलग्न येथील जन शिक्षण संस्थान रायगड या संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातील १५ तालुक्यांत १५ हजार कापडी पिशव्यांचे वाटप करून प्लॅस्टिकच्या पिशव्यांना आळा घालण्याकरिता हाती घेण्यात आलेल्या ‘कापडी पिशव्या वाटप व स्वच्छ भारत अभियान उपक्रम’ या आगळ््या उपक्रमाचा शुभारंभ भारत तन्ना यांच्या हस्ते बुधवारी तन्ना कन्सल्टन्सी कार्यालयात करण्यात आला, त्यावेळी तन्ना बोलत होते.जन शिक्षण संस्थान रायगड या संस्थेच्या माध्यमातून शिवणकाम प्रशिक्षण घेतलेल्या गरजू महिलांनी तयार केलेल्या १५ हजार कापडी पिशव्यांपैकी पहिल्या एक हजार पिशव्या विकत घेवून त्यांचे वाटप करून पर्यावरणविषयक जनजागृती करण्याचा तन्ना यांचा संकल्प आदर्शवत आहे. अशाच प्रकारे जिल्ह्यात पर्यावरणप्रेमींनी संकल्प केल्यास खऱ्या अर्थाने पर्यावरणविषयक जनजागृती होवून समाजातील गरजू महिलांना आपल्या पायावर उभेराहून स्वयंपूर्ण होण्याच्या प्रक्रियेस मोठा हातभार लागू शकेल, असा विश्वास जन शिक्षण संस्थान रायगडचे अध्यक्ष डॉ. नितीन गांधी यांनी व्यक्त केला.समाजातील गरीब महिलांना रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध व्हावी, तसेच रोजगाराबरोबरच लोकांमध्ये प्लॅस्टिक बंदीचा विचार रुजवण्यात येवून कापडी पिशव्यांच्या माध्यमातून स्वच्छता जनजागृती अभियान राबवण्यात यावे व प्रदूषणाच्या समस्येला आळा घालता यावा अशा बहुआयामी उद्देशातून जन शिक्षण संस्थान रायगड या संस्थेने रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामधून १००० कापडी पिशव्यांचे वाटप करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले असल्याची माहिती यावेळी संस्थेचे संचालक विजय कोकणे यांनी यावेळी दिली.या कौशल्य विकासातील संस्थेच्या कामगिरीबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते संस्थेस दिल्ली येथे साक्षर भारत राष्ट्रीय साक्षरता पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले असल्याची माहिती यावेळी संस्थेच्या कार्यकारिणीचे सदस्य नरेन जाधव यांनी दिली. यावेळी जन शिक्षण संस्थान रायगडचे अध्यक्ष डॉ. नितीन गांधी, संस्थेच्या कार्यकारिणीचे सदस्य नरेन जाधव आदी उपस्थित होते.
महिला रोजगार विकासातून पर्यावरण संरक्षण
By admin | Published: May 04, 2017 6:10 AM