पर्यावरण अहवालातून ३२ उद्याने गायब
By admin | Published: September 30, 2016 04:14 AM2016-09-30T04:14:33+5:302016-09-30T04:14:33+5:30
पाच वर्षांपासून महापालिकेच्या संकेतस्थळावर व पर्यावरण अहवालामध्ये शहरातील उद्यानांची संख्या १९९ असल्याचे भासविले जात होते. परंतु अद्ययावत संकेतस्थळ
- नामदेव मोरे, नवी मुंबई
पाच वर्षांपासून महापालिकेच्या संकेतस्थळावर व पर्यावरण अहवालामध्ये शहरातील उद्यानांची संख्या १९९ असल्याचे भासविले जात होते. परंतु अद्ययावत संकेतस्थळ व पर्यावरण अहवालामध्ये ही संख्या १६७ असल्याचे स्पष्ट केले आहे. तब्बल ३२ उद्याने कुठे गेली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विभागनिहाय उद्यानांचा असमतोल व प्रशासनाचा अनागोंदी कारभारही उघडकीस आला आहे.
सिडकोबरोबर महापालिकेनेही शहराचा विकास करताना पक्षपाती धोरण राबविल्याचे निदर्शनास येवू लागले आहे. शहराची शिल्पकार म्हणविणारी सिडको आम्ही प्रत्येक नोडमध्ये उद्यानासाठी भूखंड आरक्षित केले असल्याचे सांगते. महापालिका आम्ही प्रत्येक नोडवासीयांसाठी चांगली उद्याने तयार केली असल्याचे वारंवार सांगत आहे. परंतु वास्तवामध्ये दोन्ही आस्थापनांनी शहरवासीयांची दिशाभूल केली आहे. महापालिका आतापर्यंत शहरात १९९ उद्याने असल्याचे सांगत होते. परंतु काही महिन्यांपासून अचानक हा आकडा १६७ करण्यात आला आहे. यामुळे ३२ उद्याने कुठे गेली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तलाव व इतर मोकळ्या जागेवरील हिरवळही उद्यान असल्याचे भासविले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. उद्यानांचा दर्जाही त्या परिसरातील लोकवस्तीच्या आर्थिक स्तरावर अवलंबून आहे. नेरूळ पूर्व बाजूला श्रीमंतांची वसाहत असल्याने तेथे वंडर्स पार्क, रॉक गार्डन, आर. आर. पाटील उद्यान अशी भव्य उद्याने आहेत. दुसरीकडे नेरूळ पश्चिमेला गरिबांची वस्ती असल्याने तेथील उद्यानेही कमी खर्चामध्ये व कमी जागेत विकसित केली आहेत. हीच स्थिती वाशीमध्येही आहे. वाशीमध्येही माथाडी वसाहत असलेल्या ठिकाणी चांगली उद्याने नाहीत. कोपरखैरणे हा माथाडी कामगारांची वसाहत असलेला विभाग. येथील उद्यानांची स्थिती अत्यंत बिकट आहे. सिडकोने उद्यानांसाठी अत्यंत कमी जागा ठेवली आहे. सर्वात गंभीर स्थिती तुर्भे गाव व नोडमध्ये आहे तिथे उद्यानांसाठी पुरेसी जागाच नाही. घणसोलीमध्येही फक्त ३ उद्याने असून दिघामध्ये फक्त एकच उद्यान आहे. उद्यानांचे क्षेत्रफळ पाहिले तरी पालिका व सिडकोचे पक्षपाती धोरण स्पष्ट होते. बेलापूरमधील उद्यानांचे क्षेत्रफळ २ लाख ९ हजार चौरस मीटर आहे. नेरूळमध्ये २ लाख ४३ हजार एवढे आहे. कोपरखैरणेमध्ये दाट लोकवस्ती असूनही तेथे फक्त ५० हजार चौरस मीटर क्षेत्रफळ उद्यानांनी व्यापले आहे. घणसोली व दिघा परिसरातील दहा चौरस मीटर एवढी जागाही उद्यानांसाठी नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
सिडकोही
जबाबदार
महापालिकेने श्रीमंतांच्या वसाहतीमध्ये भव्य उद्याने उभारली आहेत. गरीब व मध्यमवर्गीय वस्ती असलेल्या परिसरात कमी क्षेत्रफळाची उद्याने तयार केली आहेत. यासाठी फक्त महापालिकाच जबाबदार नसून सिडकोने भूखंड आरक्षित करताना योग्य नियोजन केले नसल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. तुर्भे, नेरूळ पश्चिम, वाशी माथाडी वसाहत, कोपरखैरणे माथाडी वसाहत व गावठाण परिसरात उद्यानांसाठी पुरेसे भूखंड ठेवलेले नाहीत.
बॅकलॉग कसा दूर होणार?
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी उद्यानांचा विभागनिहाय राहिलेला बॅकलॉग भरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु प्रत्यक्षात तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली व दिघा परिसरात उद्यानांची संख्या नगण्य आहे. भविष्यात जागा उपलब्ध होण्याची शक्यताही कमी आहे. अशा स्थितीमध्ये बॅकलॉग कसा भरून निघणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.