नारायण जाधव, नवी मुंबई : पाणथळींवरील भराव, बांधकामे आणि विकासकामांमुळे फ्लेमिंगोंचा अधिवास धोक्यात आल्याची टीका पर्यावरणप्रेमींकडून होत असतानाच त्याला पुष्टी देणारी घटना नवी मुंबईच्या इतिहासात प्रथमच शुक्रवारी पहाटे घडली. फ्लेमिंगो बीच रोडवर फिरताना दिसले असून यात एका पक्षाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला आहे. यापूर्वी दोन पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे.
सिनेमॅटोग्राफर असलेले पक्षीप्रेमी हमराज खुराना यांनी याबाबतची माहिती सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. यात ते म्हणतात, आम्ही एनआरआय सिग्नलजवळ पाम बीचच्या सर्व्हिस रोडवर एका पक्षी लोळत असून तो जखमी असल्याचे निदर्शनास येताच त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. हे हिट-अँड-रनचे प्रकरण असून आजूबाजूच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याने पहाटे १.४५ च्या सुमारास घडलेली घटना रेकॉर्ड केलेली असावी, याबाबतची माहिती एनआरआय पोलिसांना दिली असल्याचे ते म्हणाले.
या घटनेनंतर खुराणा यांना पाम बीचवर आणखी एक फ्लेमिंगो चालताना दिसला. याबाबतचा व्हिडीओही त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या भागातील माजी नगरसेवक भरत जाधव यांनीही एनआरआय परिसरात दोन मृत फ्लेमिंगो दाखवणारा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
भराव आणि अतिक्रमणांमुळे फ्लेमिंगो आता पाणथळीतून बाहेर पडून रस्त्यावर उतरण्याची घटना खेदजनक असून नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी एन कुमार यांनी पर्यावरण विभागाने याची चौकशीची मागणी केली आहे. एनएचएसचे उपसंचालक डॉ. राहुल खोत म्हणाले की, फ्लेमिंगो रस्त्यावर उतरल्याचे त्यांनी पहिल्यांदाच ऐकले असून त्यांना वाचविण्यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे.
दरम्यान, कुमार म्हणाले की, डीपीएस तलाव पूर्णपणे कोरडा पडू लागल्याने काही पक्षी अन्न मिळविण्यासाठी संघर्ष करू लागले आहेत. ठाणे क्रीक फ्लेमिंगो अभयारण्यात भरतीवेळी टीएस चाणक्य पाणथळीत हजारो फ्लेमिंगो उतरताना दिसतात. यामुळे सिडकोने डीपीएस फ्लेमिंगो तलाव नवी मुंबई महानगरपालिकेला सुपुर्द करून जैवविविधता वाचवण्याचे आवाहन केल्याचे ते म्हणाले.
पर्यावरणप्रेमी रेखा सांखला यांनीही पक्ष्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करून वाहनचालकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. गेल्याच आठवड्यात येथे सौर दिव्यांच्या पॅनलची उभारणीस पर्यावरणवाद्यांनी विरोध केल्यानंतर महापालिकेेने ते काढले होते. यापूर्वीही सात फ्लेमिंगोंचा नेरूळ जेट्टीच्या साइन बोर्डला धडकून मृत्यू झाल्यावर सिडकाेने तो बोर्ड काढला होता.