खारघर टेकडीवरील सिडकोच्या टाऊनशिपला पर्यावरणवाद्यांचा विरोध
By कमलाकर कांबळे | Published: September 27, 2022 06:46 PM2022-09-27T18:46:36+5:302022-09-27T18:47:40+5:30
मुंबईतील आझाद मैदानाच्या समतुल्य क्षेत्रातील निसर्ग आणि जैव विविधतेची हानी होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे हा प्रकल्प रद्द करावा अशी मागणी पर्यावरण वाद्याने सिडकोकडे केली आहे.
नवी मुंबई - सिडकोच्या माध्यमातून खारघर टेकडीवर 106 हेक्टर जागेवर प्रस्तावित असलेल्या खारघर हिल टाऊनशिपला पर्यावरणवाद्यांनी विरोध केला आहे. या प्रकल्पामुळे मुंबईतील आझाद मैदानाच्या समतुल्य क्षेत्रातील निसर्ग आणि जैव विविधतेची हानी होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे हा प्रकल्प रद्द करावा अशी मागणी पर्यावरण वाद्याने सिडकोकडे केली आहे.
नियोजित नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाच्या बांधकाम उंची मर्यादेमुळे हा प्रकल्प अडगळीत पडला होता. परंतु इमारतीच्या उंचीचे मर्यादा अलीकडे शिथिल झाल्याने सिडकोने खारघर हिलच्या निसर्गरम्य 106 हेक्टरवर टाऊनशिप उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने कार्यवाहीसुद्धा सुरू केली आहे. मात्र पर्यावरणवाद्याने सिडकोच्या या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे.
पूर्वी या टेकडीवर नेचर पार्कचे नियोजन करण्यात आले होते. परंतु आता त्याला बगल देत निवासी आणि व्यवसायिक प्रकल्प आणण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. सिडकोचा हा निर्णय पर्यावरणाला मारक असल्याचे नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी.एन.कुमार यांनी म्हटले आहे. या संदर्भात त्यांनी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान नियंत्रण विभागाकडे लेखी तक्रार केली आहे.
संशोधकांनी खारघर हिलच्या या क्षेत्रात २९५ दुर्मिळ प्रजाती, १५ इतर अपृष्ठवंशी, १२ मासे, ९ उभयचर, २८ सरीसृप, १७९ पक्षी आणि १२ सस्तनांच्या प्रजाती असल्याचे स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर पारसिक हिलवर प्रस्तावित असलेला प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.