नवी मुंबई : नवी मुंबईतील पाम बीच मार्गावर एनआरआय आणि टीएस चाणक्य या पाणथळींसह नेरूळ सेक्टर-६० चा परिसर नवी मुंबई महापालिकेने आपल्या प्रारूप विकास आराखड्यात निवासी आणि वाणिज्यिक वापरासाठी खुला केला आहे. याविरोधात पर्यावरणप्रेमींत तीव्र संताप व्यक्त होत आहे. अशातच परिसरातील खारफुटी वाचविण्यासाठी महापालिका, सिडको आणि वन खात्याकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने या विरोधात शहरातील पर्यावरणप्रेमी एकवटले आहेत. शनिवारी विविध संघटनांनी एकत्र येऊन पाणथळींसह खारफुटी वाचविण्यासाठी पर्यावरणप्रेमींचा एल्गार पुकारला.
नवी मुंबई शहराचा फ्लेमिंगो सिटी असा उल्लेख करून महापालिकेने ठिकठिकाणी प्रतिकृती उभारल्या आहेत. मात्र, याच फ्लेमिंगोंचा अधिवास असलेल्या पाणथळींवर बांधकामक्षेत्र प्रस्तावित केले आहे. महापालिकेेची ही भूमिका दुटप्पी असल्याचे पर्यावरणप्रेमी सुनील अगरवाल यांनी सांगितले. या ठिकाणी खारफुटी समूळ नष्ट होण्यासाठी केमिकल टाकण्यात येत असल्याचा प्रकार करण्यात येत आहे. शिवाय काही घटकांकडून तिला आगी लावण्याचे प्रकार घडत आहेत.राज्य शासनाने येथील खारफुटीक्षेत्राची पाहणी केली आहे. मात्र, ठोस कार्यवाही केलेली नाही. यामुळे खारफुटीसह फ्लेमिंगोचा अधिवास वाचविण्यासाठी शनिवारी अलर्ट सिटिजन फोरम एन्व्हायरमेंट लाईफ फाउंडेशन, संस्कार फाउंडेशन, प्रकल्पग्रस्त पालक संस्था यांनी आंदोलन केले.