रुग्णालये सुसज्ज; पण डॉक्टरांअभावी बिनकामाची, कोट्यवधींचे साहित्य धूळखात

By योगेश पिंगळे | Published: August 16, 2023 10:54 AM2023-08-16T10:54:02+5:302023-08-16T10:55:47+5:30

सामग्री हाताळणारे तज्ज्ञ मनुष्यबळच नाही.

equipped hospitals but due to lack of doctors materials worth crores are wasted in navi mumbai municipal hospital | रुग्णालये सुसज्ज; पण डॉक्टरांअभावी बिनकामाची, कोट्यवधींचे साहित्य धूळखात

रुग्णालये सुसज्ज; पण डॉक्टरांअभावी बिनकामाची, कोट्यवधींचे साहित्य धूळखात

googlenewsNext

योगेश पिंगळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : शहरातील नागरिकांना आरोग्य सुविधा देण्यासाठी महापालिकेने शहरात सार्वजनिक रुग्णालये, माता बाल रुग्णालये तसेच नागरी आरोग्य केंद्रे सुरू केली आहेत. शहरातील खासगी रुग्णालयांच्या तोडीस महापालिकेची रुग्णालये निर्माण करून उपचारासाठी आवश्यक साहित्यदेखील उपलब्ध आहे; परंतु, हे साहित्य हाताळणारे तज्ज्ञ मनुष्यबळ आणि डॉक्टर्स नसल्याने त्याचा नागरिकांना कोणताही फायदा होत नाही. यामुळे कोट्यवधींची ही सामग्री सडत पडली आहे.

नवी मुंबई महापालिकेची शहरात वाशी, नेरूळ आणि ऐरोली परिसरात सार्वजनिक रुग्णालये असून बेलापूर आणि तुर्भे परिसरात माता, बाल रुग्णालये आहेत. या रुग्णालयांमध्ये शहरातील तसेच शहराबाहेरील दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येतात. महापालिकेने खासगी रुग्णालयांच्या तोडीस महापालिका रुग्णालयांच्या सुसज्ज इमारती उभारल्या असून स्वच्छतेचीदेखील काळजी घेतली जाते. उपचारासाठी विविध साहित्यदेखील उपलब्ध आहे.  

एनआयसीयू वाढल्याने दिलासा 

काही वर्षांपूर्वी महापालिकेच्या फक्त वाशी येथील रुग्णालयात एनआयसीयूची सुविधा उपलब्ध होते. त्यामुळे रुग्णांना इतर रुग्णालयात रेफर केले जात होते. मात्र, आता वाशी रुग्णालय २२, नेरूळ १६, ऐरोली २२, बेलापूर सात असे ६७ एनआयसीयू उपलब्ध असून तुर्भे येथील माता- बाल रुग्णालयात येत्या काही दिवसांत पाच एनआयसीयू बेड्सची भर पडणार आहे. संख्या वाढल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी काही वेळा उपलब्ध असलेले बेड कमी पडत असल्याने डी.वाय. पाटील किंवा जे जे रुग्णालयावर अवलंबून राहावे लागत आहे.  

गॅलरीत भंगार साहित्य

वाशी रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील गॅलरीतदेखील मोठ्या प्रमाणावर भंगार साहित्य ठेवले आहे. ते उघड्यावरच असून शेडही नसल्याने पावसात भिजून ते सडत चालले आहे.

कर्मचाऱ्यांवर ताण  

तसेच महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रासह रुग्णालयांमध्ये विविध तज्ज्ञ डॉक्टर, नर्सेस, वॉर्ड बॉय आदी सर्वच मनुष्यबळाची कमतरता आहे. उपलब्ध मनुष्यबळावर महापालिकेच्या आरोग्य विभागाचा गाडा सुरू असून यामुळे नागरिकांना आरोग्य सुविधा घेताना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. तर सध्याच्या कर्मचाऱ्यांवर मोठा ताण पडत आहे.

महापालिकेच्या रुग्णालयात मनुष्यबळ कमी पडणार नाही, याची खबरदारी घेऊ. आउटसोर्सच्या माध्यमातून मनुष्यबळ घेण्यात येईल. तसेच ११ महिन्यांच्या करारावर तज्ज्ञ डॉक्टर्स घेतले जातील. - राजेश नार्वेकर, आयुक्त, न.मुं.म.पा.

रुग्णालय     बेड्सची संख्या 

वाशी     ३०० 
नेरूळ     २४० 
ऐरोली     २०० 
बेलापूर     ७० 
तुर्भे     ५०

विभागनिहाय रुग्णालय व बेडची उपलब्धता

विभाग     रुग्णालये     बेडची संख्या
बेलापूर     २४     १,०१४
नेरूळ     ४०     २,३२८
सानपाडा    १४    १८३ 
वाशी    ४०     ९५३ 
कोपरखैरणे     २६     ७१९ 
घणसोली    १७     १८८ 
ऐरोली     ३६     ४६२ 
दिघा     ४     २३ 
एकूण     २०५     ५,८७०


 

Web Title: equipped hospitals but due to lack of doctors materials worth crores are wasted in navi mumbai municipal hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.