लोणार पोलिसांच्या तावडीतून आरोपीचे पलायन, तुर्भे नाक्यावरील घटना
By सूर्यकांत वाघमारे | Published: August 1, 2023 05:06 PM2023-08-01T17:06:10+5:302023-08-01T17:07:04+5:30
बुलढाणाच्या लोणार पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल आहे.
नवी मुंबई : अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी लोणार पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीने पोलिसांच्या तावडीतून पळ काढला आहे. मीरा भाईंदर येथून त्याला अटक केल्यानंतर बुलढाणाच्या लोणार येथे त्याला नेले जात असताना तुर्भे नाका येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी त्याच्यावर तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुलढाणाच्या लोणार पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. सदर मुलीला फूस लावून पळवून आणून मीरा भाईंदर परिसरात ठेवले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून लोणार पोलिसठाण्याचे कर्मचारी व पीडित मुलीचे नातेवाईक मीरा भाईंदर परिसरात आले होते. त्याठिकाणी शोधमोहीम राबवली असता सोमवारी विशाल साळवे (२१) हा पोलिसांच्या हाती लागला. स्थानिक पोलिसांना त्याच्या अटकेची माहिती देऊन लोणार पोलिसांनी त्याचा ताबा घेतला होता. त्यानुसार सोमवारी रात्री त्याला खासगी गाडीतून लोणार पोलिस ठाण्यात नेले जात होते.
रात्री १० च्या सुमारास त्यांची गाडी तुर्भे नाका येथे आली असता, सर्वजण हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबले होते. यावेळी गाडी थांबताच संधी साधून विशाल याने पोलिसांना चकमा देऊन पळ काढला. यावेळी पोलिसांनी त्याचा पाठलाग करून देखील तो मिळून आला नाही. याप्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्यात विशाल साळवे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.