पेब किल्ल्यावर अडकलेल्या तिघांचीसुटका; ट्रेकिंग करताना चुकले होते रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 11:42 PM2020-09-14T23:42:24+5:302020-09-14T23:43:05+5:30
ओमकार शेट्टी (२४, रा. मुंबई), जयेश मेहता (२३, रा. मुंबई), पुनीत बेहलानी (२३,रा. मुंबई) अशी तिघांची नावे आहेत.
नवीन पनवेल : पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या व त्या ठिकाणी अडकून पडलेल्या तिघांची तालुका पोलिसांनी सुखरूप सुटका केली आहे. या तिघांना रविवार, १३ सप्टेंबर रोजी तालुका पोलिसांनी खाली आणले.
ओमकार शेट्टी (२४, रा. मुंबई), जयेश मेहता (२३, रा. मुंबई), पुनीत बेहलानी (२३,रा. मुंबई) अशी तिघांची नावे आहेत. पावसाळ्याचे दिवस असल्याने मुंबई, पुणे, रायगड येथून मोठ्या प्रमाणात पर्यटक पनवेलमध्ये ट्रेकिंगसाठी येत असतात. मात्र, सध्याच्या परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याने काही ठिकाणी पोलीस बंदोबस्त असल्याने पर्यटकांना त्या ठिकाणी जाता येत नाही. परिणामी, पर्यटक चुकीचा रस्ता निवडतात आणि पोलिसांना चकवा देऊन ट्रेकिंगसाठी निघून जातात. अशाच प्रकारे १३ सप्टेंबर रोजी मालाड, मुंबई येथील ओमकार शेट्टी, जयेश मेहता, पुनीत बेहलानी हे तिघेजण पेबगडला ट्रेकिंगसाठी निघाले. पनवेल तालुक्यातील धोदानी-मालडुंगे येथून येथे त्यांनी आपली कार पार्क केली आणि ते पायी चालत ट्रेकिंगसाठी निघाले. पेबगडच्या दिशेने जात असताना ते रस्ता भरकटले. यावेळी त्यांनी नेरे येथील रूपेश पाटील यांना फोन केला व ते रस्ता चुकले असल्याचे त्यांनी त्याला सांगितले.
यावेळी हे तिघेही रस्ता चुकल्याने पाय घसरून पडले होते व त्यांना थोड्या-फार जखमा झाल्या होत्या. त्यानंतर, पाटील यांनी याची माहिती तालुका पोलिसांना दिली. त्या तीन तरुणांनी धबधब्याजवळ उभे असल्याचे सांगितले. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक नितीन पगार यांनी त्या ठिकाणी पोलीस पाठविले.
तरु णाची मदत
ठिकाणांची माहिती नसल्याने पोलिसांनी संतोष नामक एका आदिवासी मुलाला सोबत घेत सायंकाळी सहा-साडेसहाच्या सुमारास पोलिसांनी या तिघांनाही सुखरूप खाली आणले, त्यांना मालाड येथे जाण्यास परवानगी दिली.