सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : जुगाराच्या अड्ड्यावर झालेल्या कारवाईतुन वशिल्याने स्वतःची सुटका करून घेतलेल्या गुन्हेगार गटारात पडून जखमी झाल्याची घटना घडली आहे. बोनकोडे येथे मंगळवारी पहाटे गुन्हे शाखेच्या वतीने टाकण्यात आलेल्या छाप्यावेळी हा प्रकार घडला. दरम्यान कारवाईत पकडण्यात आलेल्या व्यक्तींमधून एका व्यक्तीला बाजूला काढून पळण्याची सवलत देण्याच्या प्रकारावरून गुन्हे शाखा आणि कोपर खैरणे पोलीस यांच्यात पहाटेपर्यंत खटके सुरु होते.
कोपर खैरणे सेक्टर १२ येथे सुरज अंकुश पाटील याच्याकडून जुगार चालवला जात असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास त्याठिकाणी छापा टाकला. यावेळी कारवाईसाठी कोपर खैरणे पोलिसांना देखील मदतीसाठी बोलवण्यात आले होते. या कारवाईत त्याठिकाणी चालणारा जुगाराचा अड्डा उघड झाल्यानंतर संबंधितांवर कारवाई करून ताब्यात घेण्यात आले होते. त्यामध्ये जुगार अड्डा चालक सूरज याच्यासह जुगार खेळण्यासाठी जमलेल्या रितेश कोळसकर, विशाल बेलोसे, फय्याज कुरेशी, आशिष कुमार, आसिफ कुरेशी, जावेद कुरेशी व तौसिफ़अली शेख यांच्यासह इतर एकाचा समावेश होता.
पोलिसांनी गुन्ह्यातून वगळलेल्या या व्यक्तीवर अनेक गुन्हे दाखल असून, जुगारावरील कारवाईतही तो हाती लागला. यावेळी गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्यासोबत त्याचा सु-संवाद झाल्यानंतर घटनास्थळावरून संबंधितांना पोलीस ठाण्यात नेले जात असताना, त्याला वेगळ्या वाहनात बसवण्यात आले. यावेळी संधी मिळताच तो पळून जात असतानाच काही अंतरावर असलेल्या गटारात पडल्याने पायाला गंभीर दुखापत झाल्याने थेट रुग्णालय गाठावे लागले. त्याच्यावर वाशीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. परंतु घडलेल्या या प्रकारावरून कोपर खैरणे पोलीस व गुन्हे शाखा पोलीस यांच्यात खटका उडाला होता. ताब्यात घेतलेल्या सर्वांना एकाच वाहनातून नेले जात असताना, केवळ एकाला वेगळ्या गाडीत बसवण्याच्या बहाण्याने पळून जाण्याची सवलत दिली का ? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यामुळे रात्री अडीच वाजता झालेल्या कारवाईचा सकाळी ८ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातूनही पळून जाताना पडून जखमी झालेल्याचे नाव वगळण्यात आल्याने गुन्हे शाखेच्या कारवाईंबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. गुन्हे शाखा उपायुक्त सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली काही दिवसांपासून अवैध धंद्यांवर कारवाईचा धडाका सुरु आहे. परंतु कारवाईवेळी अधिकाऱ्यांकडून पारदर्शकता राखली जात नसल्याचे अशा प्रकारणांवरून समोर येत आहे.