नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेतील सत्तांतराच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. राष्ट्रवादीच्या ५५ नगरसेवकांची महापौर बंगल्यावर सोमवारी बैठक पार पडली. त्यानंतर दुपारी ३ वाजता कोकण आयुक्तांकडे जाऊन वेगळा गट स्थापन करण्याचा मुहूर्त निश्चित करण्यात आला. परंतु या प्रक्रियेत काही तांत्रिक त्रुटी राहिल्याने ५५ नगरसेवकांच्या विलीनीकरणाचा मुहूर्त टळला.
दरम्यान, मंगळवारी दिवसभरात राहिलेल्या त्रुटी दूर करून बुधवारी सकाळी कोकण आयुक्तांकडे प्रतिज्ञापत्र सादर केले जाईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते अनंत सुतार यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री गणेश नाईक बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे ५५ नगरसेवक भाजपत प्रवेश करणार असल्याने महापालिकेत सत्तांतर होणार आहे. या सत्तांतराची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नगरसेवकांना कोकण आयुक्तांकडे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे. या अगोदर प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी ६ सप्टेंबरचा मुहूर्त निश्चित करण्यात आला होता. मात्र नियोजित ९ सप्टेंबरच्या भाजप प्रवेशाला मुख्यमंत्र्यांकडून तारीख न मिळाल्याने ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. त्यानुसार सोमवारी महापौर बंगल्यावर ५५ नगरसेवकांची बैठक झाली. या वेळी नगरसेवकांची प्रतिज्ञापत्रे व इतर कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानंतर दुपारी ३ वाजता कोकण आयुक्तांकडे जाऊन वेगळा गट स्थापन करण्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र, सायंकाळपर्यंत यासंदर्भात कोणतीच हालचाल झाली नाही. अखेर सायंकाळी राष्ट्रवादीचे नेते अनंत सुतार यांनी यासंदर्भात खुलासा करीत संभ्रम दूर केला.
कोकण आयुक्तांच्या सूचनेनुसार काही तांत्रिक बाबींची पूर्तता राहून गेल्याने विलीनीकरणाची प्रक्रिया होऊ शकली नाही. मात्र, मंगळवारी आवश्यक बाबींची पूर्तता करून बुधवारी सकाळी कोकण आयुक्तांकडे प्रतिज्ञापत्र सादर केले जाईल. त्यानंतर सायंकाळी वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गणेश नाईक, संजीव नाईक यांच्यासह ५५ नगरसेवक भाजपत प्रवेश करतील, असे सुतार यांनी स्पष्ट केले आहे.