गोरक्षणाच्या नावाखाली हप्तेवसुली सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 03:12 AM2017-07-19T03:12:40+5:302017-07-19T03:12:40+5:30

पनवेलमधील शिवसेना पदाधिकारी गोरक्षणाच्या नावाखाली गोमांस वाहतूक करणाऱ्यांना मदत करत असल्याची चित्रफीत प्रसिद्ध झाल्याने खळबळ उडाली आहे.

The establishment of the installment in the name of the protection of the people | गोरक्षणाच्या नावाखाली हप्तेवसुली सुरू

गोरक्षणाच्या नावाखाली हप्तेवसुली सुरू

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : पनवेलमधील शिवसेना पदाधिकारी गोरक्षणाच्या नावाखाली गोमांस वाहतूक करणाऱ्यांना मदत करत असल्याची चित्रफीत प्रसिद्ध झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी राजेश पांडे व डी. एन. मिश्रा या दोघांचीही शिवसेनेने तडकाफडकी पक्षातून हकालपट्टी केली आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होऊ लागली आहे.
नवी मुंबई, तळोजा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शीतगृह असून त्यामध्ये निर्यात करण्यासाठीचे मांस साठविले जाते. प्रक्रिया केलेले मांसही याच ठिकाणी ठेवण्यात येते व नंतर ते विदेशामध्ये पाठविण्यात येते. याशिवाय देवनार कत्तलखान्याकडे जाणाऱ्या शेळ्या, मेंढ्या व इतर प्राणीही सायन - पनवेल महामार्गावरून जातात. यापूर्वी गोमांस व प्राण्यांची वाहतूक करणारी वाहने कळंबोलीत गोरक्षकांनी अडविली होती. नवी मुंबई परिसरामध्येही अनेक वेळा कारवाई करण्यात आली आहे. परंतु प्रामाणिक गोरक्षकांबरोबर हप्तेवसुली करणाऱ्यांचीही चलती सुरू असल्याचे मागील काही महिन्यांपासून बोलले जात होते. एका खासगी वृत्त वाहिनीने चार दिवसांपूर्वी प्रसिद्ध केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये येथील शिवसेनेचे पदाधिकारी राजेश पांडे व डी. एन. मिश्रा हे दोघे गोमांस वाहतूक करणाऱ्यांना मदत करण्याची चर्चा करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पांडे यांनी यापूर्वी महामार्गावर एक गाडी पकडली होती. त्याला सेटिंग करण्यास सांगितल्यानंतरही ऐकले नसल्याने आम्ही गाडीच जाळली होती असे मत व्यक्त केले. नंतर त्याच्या मध्यस्थीने मिश्राच्या शिवसेना कार्यालयामध्ये बैठक आयोजित केली व तेथे सर्व प्रकारची मदत केली जाणार असल्याचे दोघांनी आश्वासन दिल्याचे स्पष्ट झाले होते. हा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
गोमांस वाहतूक करणाऱ्यांना मदत करण्याचा प्रकार निदर्शनास येताच शिवसेनेने मिश्रा व पांडे दोघांचीही शिवसेनेमधून हकालपट्टी केली आहे. वास्तविक पक्षातून हकालपट्टी केल्याने हा विषय संपलेला नसून पनवेल परिसरामध्ये याविषयी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या घटनेमध्ये किती सत्य आहे, या दोघांनी यापूर्वी अशाप्रकारे गोमांस वाहतुकीसाठी मदत केली होती का? आतापर्यंत केलेल्या कामगिरीविषयी चौकशी करण्याची मागणी होवू लागली आहे. अशाप्रकारे चुकीचे काम त्यांनी केले असेल किंवा इतरही कोणी करत असल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. सखोल चौकशी झाली नाही तर भविष्यात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडेही संशयाने पाहिले जाईल असे मत व्यक्त होत आहे. मिश्रा याने महापालिका निवडणुकीमध्ये प्रभाग ९० मधून निवडणूक लढविली होती. यामध्ये त्याला पराभवास सामोरे जावे लागले होते.

राजेश पांडेशी संपर्क नाही
गोमांस वाहतुकीस मदत करण्याच्या चित्रफितीमध्ये राजेश पांडेची महत्त्वाची भूमिका असल्याचे दिसत आहे. यापूर्वी सेटिंग न झाल्याने एक वाहन पेटवून दिल्याचेही तो बोलताना दिसत असून त्यानेच मिश्राबरोबर मिटिंग घडवून आणली होती. याविषयी प्रतिक्रिया घेण्यासाठी त्याच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला, परंतु संपर्क होवू शकला नाही.

डी. एन. मिश्रांनी फेटाळले आरोप
याविषयी माहिती घेण्यासाठी डी. एन. मिश्राशी संपर्क साधला असता त्यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. मी जवळपास दोन दशकांपासून या परिसरामध्ये सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये काम करत आहे. आतापर्यंत मी कोणाकडेही खंडणी मागितलेली नाही. कोणतेही चुकीचे काम केलेले नाही. मला बदनाम करण्याचे षड्यंत्र आहे. वास्तविक निवडणुकीपूर्वीच हे करण्यात येणार होते. माझी प्रगती पहावत नसल्याने हे प्रकार करण्यात आले आहेत. माझ्या कार्यक्षेत्रामध्ये कोणालाही विचारा मी कधीच चुकीची कामे केलेली नाहीत. याविषयी कायदेशीर सल्ला घेवून आम्ही पुढील भूमिका निश्चित करणार आहोत. मी निर्दोष असून, हे भविष्यात सिद्ध होईल असा दावाही त्यांनी केला आहे. जवळपास तीन वर्षांपासून काही जण माझे नुकसान करण्यासाठी मागे लागले असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

Web Title: The establishment of the installment in the name of the protection of the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.