नवी मुंंबई : ऑक्सिजन पुरवठ्यावर काटेकोरपणे लक्ष ठेवण्यासाठी महानगरपालिका मुख्यालयात वॉर रूम कार्यान्वित करण्यात आली आहे. मनपा व खासगी रुग्णालयातील साठ्यावर चोवीस तास लक्ष ठेवले जाणार आहे. ऑक्सिजन पुरवठादार कंपन्यांमध्येही मनपाने प थके तैनात केली असून पोर्टेबल ऑक्सिजन जनरेटर प्लांट उभारण्यासाठीची प्रक्रिया सुुरू केली आहे.नवी मुंबईमध्येही कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची मागणी वाढत आहे. नाशिकमध्ये घडलेल्या ऑक्सिजन गळती दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी विशेष खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.
मनपाच्या वाशी प्रदर्शन केंद्र, डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय, एमजीएम कामोठे, राधास्वामी सत्संग भवन व निर्यात भवन येथे ऑक्सिजन बेडची व्यवस्था आहे. याशिवाय २६ खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची सुविधा आहे. सर्व ठिकाणच्या ऑक्सिजन पुरवठ्यावर लक्ष ठेवण्यासाठी महानगरपालिकेने वॉर रूम स्थापन केली आहे. येथून प्रत्येक तीन तासांनी ऑक्सिजन पुरवठ्याचा आढावा घेतला जाणार आहे.
उत्पादकाकडून एमआयडीसीमध्ये टँकरमधून येणारा ऑॅक्सिजनचा साठा व वितरण यावर लक्ष ठेवण्यासाठीही २४ तास पथक तैनात केले आहे. सर्व नोडल अधिकाऱ्यांना खासगी रुग्णालयांच्या संपर्कात राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व रुग्णालयांनी किमान २४ तास पुरेल एवढा साठा करून ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय महानगरपालिकेने पोर्टेबल ऑक्सिजन जनरेटर प्लांट उभारण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.