घारापुरीत विकासकामांना गती देण्यासाठी एकच समिती स्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 01:11 AM2018-12-02T01:11:46+5:302018-12-02T01:11:48+5:30
घारापुरीची विविध विकासकामे यापुढे एकाच समितीच्या अधिपत्याखाली आणण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत घेण्यात आला आहे.
उरण : घारापुरीची विविध विकासकामे यापुढे एकाच समितीच्या अधिपत्याखाली आणण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत घेण्यात आला आहे. यापुढील बैठक दिल्लीत घेण्यात येणार आहे. दिल्लीत होणाºया बैठकीत बेटावरील नियोजित विविध विकासकामांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित अधिकारी आणि घारापुरी ग्रामपंचायत यांच्यात चर्चा करण्यात आली.
घारापुरी बेटाच्या विकासासाठी विविध समित्या कार्यरत आहेत. मात्र, वेगवेगळ्या समित्या असल्याने विकासकामांबाबत निर्णय घेण्यास विलंब होतो, त्यामुळे नियोजित विकासकामे होण्यासही दिरंगाई होते. यामुळे घारापुरी बेटावरील विकासकामांच्या निर्णयासाठी एकच समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
घारापुरी बेटाच्या प्रस्तावित विकासकामांबाबत याआधी मुख्यमंत्र्यांच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्यानंतर मंगळवार, (२६ नोव्हेंबर) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित बैठकीस राजिपचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, घारापुरी ग्रामपंचायतीचे सरपंच बळीराम ठाकूर, ग्रामविकास अधिकारी अमित तपकिरे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत घारापुरी बेटावर प्रस्तावित असलेला घनकचरा व्यवस्थापन करणे (झिरो गार्बेज), ग्राम सचिवालय बांधणे आणि सुशोभीकरण करणे, राजबंदर जेट्टी ते एलिफंटा लेण्यापर्यंतच्या रस्त्याचे काँक्र ीटीकरण व गटार बनविणे, राजबंदर गावातील अंतर्गत रस्ते बनविणे, शेतबंदर जेट्टी ते राजबंदर जेट्टीपर्यंत संरक्षण भिंत बांधणे, राजबंदर येथील धरणाजवळ पर्यटकांसाठी बगिचा तयार करणे, एलिफंटा गुंफा ते शेतबंदर जेट्टीकडे जाणारा जुन्या रस्त्याचे काँक्रीटीकरण, राजबंदर येथील लहान-मोठी जेट्टीची दुरु स्ती, शेतबंदर जेट्टी ते पोलीस चौकीपर्यंत पायरस्त्यावर शेड बांधणे आदी कामांबाबत नियोजन करण्यात येणार आहे.
घन कचºयाचे व्यवस्थापन करण्याकरिता डम्पिंग ग्राउंडसाठी जागा उपलब्ध करणे, घारापुरी बेटावर कायमस्वरूपी वैद्यकीय सेवा पुरविणे, शेतबंदर येथील एलिफंटा गुहेजवळील वनविभागाच्या अखत्यारित असलेल्या जागेमध्ये बगिचा तयार करणे, धरणाच्या व चारही बाजूला सरंक्षण भिंत बांधणे, घारापुरी बेटावर ठिकठिकाणी पर्यटकांसाठी तसेच प्रवाशांसाठी निवारा शेड तयार करणे, राजबंदर जेट्टीवर पाणपोईची सुविधा निर्माण करणे, शेतबंदर ते मोराबंदर दरम्यानचा पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत झालेल्या कच्च्या रस्त्याचे डांबरीकरण करणे, घारापुरी बेटासाठी २४ तास बोट अॅम्बुलन्सची सेवा पुरविणे आदी प्रस्तावित विकासकामांबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
या कामांबाबत अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यासाठी पुढील बैठक दिल्ली येथे बैठक होणार आहे.