ईटीसी केंद्रांच्या व्यवहाराची होणार चौकशी
By admin | Published: April 9, 2017 02:53 AM2017-04-09T02:53:54+5:302017-04-09T02:53:54+5:30
महापालिकेच्या वाशी येथील ईटीसी अपंग प्रशिक्षण (दिव्यांग) केंद्रातील कथित गैरकारभाराची चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच केंद्राच्या संचालकपदाच्या
नवी मुंबई : महापालिकेच्या वाशी येथील ईटीसी अपंग प्रशिक्षण (दिव्यांग) केंद्रातील कथित गैरकारभाराची चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच केंद्राच्या संचालकपदाच्या नियुक्तीबाबतही सखोल पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशा आशयाची घोषणा नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी विधानसभेत केली आहे. त्यामुळे येत्या काळात ईटीसी केंद्राच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दिव्यांग मुलांसाठी महापालिकेच्या माध्यमातून वाशी येथे ईटीसी अपंग शिक्षण व प्रशिक्षण सेवा केंद्र चालविण्यात येत आहे; परंतु मागील काही काळापासून विविध कारणांमुळे हे केंद्र वादग्रस्त ठरले आहे. तसेच केंद्राच्या संचालिका वर्षा भगत यांची नियुक्ती नियमबाह्य असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या केंद्राच्या एकूण कारभारावरून महापालिकेतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजपामध्ये वादाची ठिणगी पडली होती. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी या केंद्राच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. तर खासदार राजन विचारे यांनी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत या केंद्राची पाहणी करून कारभार पारदर्शक असल्याचा निर्वाळा दिला होता. त्यामुळे शिवसेना आणि भाजपात दरी वाढली होती. असे असतानाही आमदार मंदा म्हात्रे यांनी या केंद्राच्या कारभाराची चौकशी व्हावी, यासाठी पाठपुरावा सुरूच ठेवला होता. त्यानुसार विधिमंडळ अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी त्यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून या केंद्राच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यावरील चर्चेला उत्तर देताना नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी ईटीसी केंद्राच्या कारभाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा केली. तसेच केंद्राच्या संचालकपदाची नियुक्ती वैध आहे की नाही, याचीही माहिती घेऊन आवश्यकतेनुसार कारवाई करण्यात येईल, असेही राज्यमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)