इंधन म्हणून इथेनॉलचा वापर शक्य - गडकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 05:29 PM2018-09-27T17:29:24+5:302018-09-27T17:30:03+5:30
चार शहरांत दहा बसेसचा पायलट प्रोजेक्ट
नवी मुंबई: पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीवर इथेनॉलचा पर्याय उत्तम ठरू शकतो. सध्या भारतात मोठया प्रमाणात इथेनॉलची निर्मिती होते. या इथेनॉलचा वाहनांत इंधन म्हणून वापर करणे शक्य आहे. त्यानुसार मुंबई, नवी मुंबई, पुणे आणि गुवाहाटी या चार शहरांत प्रायोगिक तत्त्वावर इथेनॉलवर चालणाऱ्या दहा बसेस सुरू करण्यात आल्याची माहिती रस्ते वाहतूक आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये मटेरियल इंजिनीयर आणि टेक्नॉलॉजी, तसेच हिट ट्रेटचे तीन दिवसीय प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. गुरुवारी गडकरी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. त्या वेळी ते बोलत होते.
भारताने इलेक्ट्रिकल व्हेईकल्समध्ये चांगले तंत्रज्ञान विकसित केले आहे. सध्या इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या दुचाकी, कार व ऑटो रिक्षा बाजारात येत आहेत. असे असले तरी या तंत्रज्ञानात अधिक प्रगती करण्याची गरज असल्याचे मत गडकरी यांनी व्यक्त केले. देशात टाकाऊ वस्तूंचे प्रमाण मोठे आहे. टाकाऊपासून उपयुक्त उत्पादने तयार करणारे तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज आहे. त्यासाठी वैज्ञानिकांनी पुढे यावे, असे आवाहन नितीन गडकरी यांनी या वेळी केले.