सात महिने उलटूनही मनरेगाकडून मजूरी नाही
By admin | Published: July 25, 2015 10:22 PM2015-07-25T22:22:34+5:302015-07-25T22:22:34+5:30
मोखाड्यात मनरेगाच्या कामाचा सावळागोंधळ सुरूच असून सात महिने उलटले तरी सातुर्ली येथील कामगारांना आपल्या कामाचा मोबदला मिळालेला नाही.
मोखाडा : मोखाड्यात मनरेगाच्या कामाचा सावळागोंधळ सुरूच असून सात महिने उलटले तरी सातुर्ली येथील कामगारांना आपल्या कामाचा मोबदला मिळालेला नाही. या कारभारामुळे एका मजुराचा पैसे नसल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली असून उपचाराअभावी एका कामगाराला पक्षघातामुळे अपंगत्व आले आहे. असे असतानादेखील मनरेगाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने कामगारांमधून संताप व्यक्त होत आहे. या अन्यायाविरोधात श्रमजीवी संघटना ३१ जुलै रोजी तहसील पंचायत समिती कार्यालयावर जाब विचारण्यासाठी धडकणार आहे.
सातुर्ली येथील ८० कामगारांनी जानेवारी महिन्यात मनरेगाच्या योजनेत काम केले आहे. मागेल त्याला काम आणि १५ दिवसांत दाम, अशी या योजनेत तरतूद असतानादेखील ७ महिन्यांचा कालावधी उलटूनही या कामगारांना मजुरी मिळाली नसून तहसील कार्यालय व पंचायत समितीचे उंबरठे झिजवूनसुद्धा अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. उपासमारीची वेळ आलेल्या या कामगारांपैकी त्यातच भगवान भाऊ बरफ या कामगाराचा किरकोळ आजाराने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्याचबरोबर आते, खोच, गोदे बुदु्रक, धोत्याचापाडा येथील गावांतील कामगारांना मजुरी मिळालेली नाही. शिरसगावामधील २६ कामगारांनी पाच महिन्यांपूर्वी ६ दिवस काम केले होते. मात्र, त्यांनाही मजुरी मिळू शकलेली नाही. त्यातील वामन दिवे हा कामगार सध्या पक्षवाताच्या आजाराचा सामना करीत असून अशा या दळभद्री यंत्रणेच्या विरोधात तालुक्यातून संतापाच्या प्रतिक्रिया उमटत असून संबंधितांकडून तांत्रिक अडचणीचे कारण पुढे केले जात आहे. (वार्ताहर)
मनरेगाच्या कामात मोठ्या प्रमाणात सावळागोंधळ सुरूच असून या कुचकामी यंत्रनेमुळे कामे करूनही तालुक्यातील आदिवासींना मजुरी मिळालेली नाही. अनेकदा ही बाब निदर्शनास आणून दिली असताना याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे ३१ जुलै रोजी आंदोलन केले जाणार आहे.
- गणेश माळी, तालुकाध्यक्ष मोखाडा