नवी मुंबई : पर्यावरणाला हानिकारक असलेल्या थर्माकोलच्या मखरावरची आणि सजावट साहित्यावर बंदी घालण्यात आली आहे. परंतु, शहरातील बाजारपेठांमध्ये छुप्या पद्धतीने थर्माकोलच्या मखराची विक्री केली जात आहे, तर काही ठिकाणी थर्माकोलच्या रूपात काहीसा बदल करून तयार करण्यात आलेल्या मखरची बाजारात खुलेआम विक्री होत आहे.
हे मखरदेखील पर्यावरणाला हानिकारक असून, महापालिका प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जात आहे. अवघ्या काही दिवसांवर आलेल्या गौरी-गणपतीसाठी नवी मुंबई शहरात विविध ठिकाणी सजावट साहित्याने दुकाने सजली असून, मंदिरापासून ते मोत्याच्या माळा, इलेक्ट्रिक वस्तूंपर्यंत सर्वच आकर्षक वस्तू बाजारात दाखल झाल्या आहेत. सजावट साहित्यामध्ये एलईडी दिव्यांच्या माळा, झुंबर, रंगीबेरंगी पताका व अन्य इलेक्ट्रिक आकर्षक साहित्य बाजारात झळकत आहेत.
नवे मखरही पर्यावरणाला घातकचबाजारातील काही दुकानांमध्ये बदललेल्या रूपातील टणक थर्माकोलची मखरे विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. खुलेआम पद्धतीने विक्री होणारे नवीन मखर पर्यावरणाला घातक नाहीत का? असा सवाल नागरिकांकडून केला जात असून, या प्रकाराकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
तुर्भेत छुप्या पद्धतीने विक्री सुरूचपर्यावरणाला हानिकारक असलेल्या प्लास्टिक आणि थर्माकोलवर राज्यात बंदी घालण्यात आली आहे. तुर्भेतील माथाडी भवन परिसरातील मार्केटमध्ये छुप्या पद्धतीने थर्माकोलच्या मखरांची विक्री केली जात आहे.