लोकमत न्यूज नेटवर्कभातसानगर : कुठलीही व्यक्ती निवृत्त म्हणा किंवा वय झाली की निवांत आयुष्य जगत असते. मात्र शहापूर तालुक्यातील बिरवाडी ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत असलेल्या मडवी पाडा येथील ७० वर्षांचे आजोबा आजही आपली आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारी टोपल्या बनवून व त्या विकून समर्थपणे पार पाडत आहेत. आजच्या तरुण पिढीसाठी हे आदर्श ठेवण्यासारखेच आहे.
मडवी पाडा येथे असलेले बुधा धावू धापटे हे आपल्या चारही मुलांची लग्न झाल्यानंतरही निवांत आयुष्य जगत नाहीत. मुलाकडे राहत असून फुकट राहायचे नाही अशी त्यांची भूमिका आहे. लहानपणापासूनच टोपल्या त्याचप्रमाणे दुरड्या बनवणे आणि या दुरड्या जवळच असलेल्या बिरवाडी गावात जाऊन विकणे आणि त्यावर आपला चरितार्थ चालवणे असा त्यांचा रोजचा कार्यक्रम असतो.आज गावांमध्ये या टोराच्या वस्तू अर्थात दुरडी (भाकरी ठेवण्यासाठी वापर केला जातो) ती ५० ते ६० रुपये आणि टोपली जवळजवळ ७० ते ८० रुपयांना विकली जाते. दुरडी बनविण्यासाठी साधारण तीन ते चार तास लागतात तर एक टोपली बनविण्यासाठी चार ते पाच तास लागतात. दिवसाला दोन दुरड्या तयार होतात तसेच दोन टोपल्या तयार होतात. या गावात विकून त्यातून मिळणाऱ्या पैशावर कुटुंबाची उपजीविका ते करतात. त्यांना तीन मुली आणि एक मुलगा असून सर्वांची लग्न झाली आहेत.
कामातून समाधान मिळतेआपल्या या व्यवसायामध्ये अत्यंत खूश असल्याचे बुधा धापटे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. वय झाले की माणसे काम करायला नकार देतात. मी करत असलेल्या कामातून खूप समाधान मिळते, असे ते म्हणाले. काम केल्याने व्यायाम होतो, आनंद होतो, असे त्यांनी सांगितले.