पंतप्रधानांच्या आगमनापूर्वीच शासकीय यंत्रणा कामाला; रस्ते चकाचक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 07:41 PM2024-01-09T19:41:24+5:302024-01-09T19:41:53+5:30
बेलापूर किल्ल्यापासून गव्हाण उड्डाणपूलापर्यतचे रस्ते चकाचक: स्वच्छतेच्या कामात शेकडो कर्मचारी सहभागी
उरण : शिवडी- न्हावा सेतूच्या उद्घाटनासाठी येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी सरकारी यंत्रणा आगमनापुर्वीच कामाला लागली आहे. देशातील सर्वात मोठ्या लांबीच्या शिवडी- न्हावा सेतूचे उद्घाटन १२ जानेवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यानिमित्ताने उलवे येथील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेत उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनापुर्वीच सर्वच शासकीय यंत्रणा कामाला जुंपल्या आहेत.नवीमुंबई बेलापूर किल्ल्यापासून उलवा-गव्हाण दरम्यानचे दुतर्फा रस्ते स्वच्छ करण्यासाठी पनवेल, नवीमुंबई महापालिका आणि सिडकोचे शेकडो सफाई कर्मचारी कामात गुंतले आहेत.दोन्ही रस्त्यांच्या मध्यभागी असलेल्या दुभाजक मधील सुशोभीकरणासाठी लावण्यात आलेल्या फुलझाडांना पाणी दिले जात आहे. झाडांच्या बुंध्याशी असलेले गवत, कचरा,घाण साफ केली जात असल्याचे दृश्य दिसते आहे.रस्त्यांच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकांची साफसफाई करून रंगरंगोटी करण्यात येत आहे.
पंतप्रधानांच्या आगमनापुर्वीच स्वागतासाठी विविध शासकीय विभागांकडून सुरू असलेल्या या दुरुस्ती व साफसफाईच्या कामांमुळे प्रवासी, वाटसरूंकडून समाधान व्यक्त केले जात आहे.रस्ते चकाचक आणि स्वच्छता कायम राहण्यासाठी पंतप्रधानांचे दौरे
नियमितपणे व्हावेत अशी इच्छाही वाटसरू, प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.