मांजरांनाही सोन्याची किंमत, नवी मुंबईत आशिया खंडातील मोठे प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2023 11:38 AM2023-06-12T11:38:31+5:302023-06-12T11:38:57+5:30
फेलाईन क्लब ऑफ इंडियाच्या वतीने सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये रविवारी प्रदर्शनाचे आयोजन केले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : हौशेला मोल नसते हे नवी मुंबईमधील आशिया खंडातील सर्वांत मोठे मांजरांचे प्रदर्शन पाहून मुंबई, नवी मुंबईमधील नागरिकांना अनुभवता आले. देशातील २२ शहरांमधून १२ प्रजातींची ५०० पेक्षा जास्त मांजरे या प्रदर्शनामध्ये पाहता आली. देशात मांजरांनाही साेन्याची किंमत येऊ लागली असून देशभरातील मार्केटमध्ये १० हजार रुपयांपासून ५ लाख रुपयांपर्यंतचा भावही मिळत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.
फेलाईन क्लब ऑफ इंडियाच्या वतीने नवी मुंबईमधील सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये रविवारी या प्रदर्शनाचे आयोजन केले होते. यामध्ये भोपाळ, दिल्ली, जम्मू काश्मीर, बंगळुरु, मुंबई, कराडसह २२ शहरांमधून आलेली सर्वोत्कृष्ट प्रजातींची मांजरे पाहता आली. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट मांजरांची निवड करण्यासाठी इंडोनेशिया, सिंगापूर,मलेशिया येथून परीक्षक बोलावण्यात आले होते. पार्सियन, बेंगाल, मैनकूल, ब्रिटिश शाॅर्ट हेअर, क्लासिक लाँग हेअर, क्लासिकल शॉर्ट हेअरसह एकूण १२ प्रजातींची मांजरे येथे पाहावयास उपलब्ध होती.
पाळीव प्राण्यांच्या रक्षणाचा संदेश
पाळीव प्राण्यांच्या रक्षणाचा संदेश देण्यासाठी व मांजर पाळणाऱ्यांना सन्मान मिळवून देण्यासाठी अशा प्रकारच्या प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. सर्वोत्कृष्ट मांजरांसाठी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत असल्याची माहिती यावेळी फेलाईन क्लब इंडियाचे मुंबई प्रमुख सुधीर यमगर यांनी दिली. मांजरे पाहून सहभागी झालेल्या नागरिकांना त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही. देशभरात चांगल्या प्रजातीच्या मांजरांना १० हजार रुपयांपासून ५ लाख रुपयांपर्यंत भाव मिळतो अशी प्रतिक्रिया काही जाणकारांनी व्यक्त केली.
सर्वोत्कृष्ट प्रजातींची मांजरे एकाच ठिकाणी पाहण्याची संधी या प्रदर्शनामुळे प्राप्त झाली. हा एक सकारात्मक उपक्रम असून प्रदर्शन पाहून आनंद झाला. - सोनाली कुलकर्णी, अभिनेत्री
मांजर पाहणाऱ्यांना सन्मान मिळवून देण्यासाठी व त्यांचा सन्मान करण्यासाठी हे प्रदर्शन भरविले आहे. २२ शहरांमधील १२ पेक्षा जास्त प्रजातींची ५००० पेक्षा जास्त मांजरांचा प्रदर्शनात सहभाग होता. - साकीब पठाण, अध्यक्ष फेलाईन क्लब ऑफ इंडिया