नवी मुंबई : अधिकाऱ्यांच्या नियोजनातील त्रुटींमुळे कोपरखैरणेतील महापालिकेची वास्तू दोन महिन्यांपासून वापराविना पडून आहे. त्याठिकाणी विजेची जोडणी होण्यापूर्वीच घाईमध्ये उद्घाटन उरकण्यात आले. तर उद्घाटनानंतर दोन महिन्यांनी तिथल्या सफाईच्या कामाची निविदा काढण्यात आली आहे.कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या शहरातील पालिकेच्या वास्तू धूळ खात पडून आहेत. त्यामध्ये अग्निशमन केंद्रासह समाजमंदिरांचाही समावेश आहे. पालिकेच्या वतीने कोपरखैरणे सेक्टर ५ येथील २४ क्रमांकाच्या भूखंडावर भव्य समाजमंदिर उभारण्यात आले आहे. त्यास आमदार अण्णासाहेब पाटील स्मृतीभवन हे नाव देण्यात आले आहे. यामुळे सदर वास्तूसोबत परिसरातील रहिवाशांसह माथाडी कामगारांच्या भावना जडल्या आहेत. वास्तूचे बांधकाम व रंगरंगोटीचे काम उरकताच उर्वरित अंतर्गतची कामे बाकी असतानाच लोकसभा निवडणुकीपूर्वी घाईमध्ये उद्घाटन उरकण्यात आले. परिणामी त्याठिकाणी जनरेट लावण्याची वेळ संबंधित ठेकेदारावर आली आहे.महापालिकेच्या सदर वास्तूमध्ये विजेची जोडणी करण्यासाठी पालिकेकडून महावितरणकडे आवश्यक पूर्तताच झालेली नाही. मुळात बांधकाम अंतिम टप्प्यात असतानाच त्याठिकाणी वीज मीटरच्या जोडणीची प्रक्रिया उरकणे आवश्यक होते. तसे न झाल्याने मागील दोन महिन्यांपासून जनरेटरद्वारे तिथे वीज पुरवली जात आहे. यावरून स्थानिक नगरसेवक शंकर मोरे यांनी प्रशासनाला धारेवर धरत अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनाबाबत संताप व्यक्त केला. त्यानंतर जागे झालेल्या अधिकाºयांनी सुमारे पावणे पाच लाखांची अनामत रक्कम भरून महावितरणकडे मंगळवारी वीज जोडणीसाठी अर्ज केल्याचेही मोरे यांनी सांगितले.वास्तूमध्ये दोन भव्य सभागृह व प्रशस्त वाहन पार्किंगची सोय करण्यात आलेली आहे. त्यामुळे वापरायोग्य स्थितीत या वास्तूचे लोकार्पण झाले असते, तर परिसरातील अनेक गरजवंतांना लग्नसमारंभ अथवा इतर कार्यक्रमांसाठी ती उपयुक्त ठरली असती.।अनेक कामे अपूर्णसाफसफाईच्या कामाचे कंत्राट बाकी असतानाच लोकसभा निवडणुकांपूर्वी अपूर्णावस्थेतील वास्तूचे उद्घाटन करण्यात आले.दोन महिने वास्तू वापराविना पडून राहिल्यानंतर आता सफाईच्या कामाची निविदा काढण्यात आली आहे. त्यामधूनही प्रशासनातील ढिसाळ नियोजन दिसून येत आहे.
वीज जोडणीआधीच पालिकेच्या वास्तूचे उद्घाटन, दोन महिने धूळखात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 11:47 PM