प्लॅटफॉर्म बंद झाला तरी सुविधा जास्त प्रमाणात मिळणार; प्रवाशांनी सहकार्य करण्याचा केंद्रीय मंत्र्यांचे आवाहन
By पंकज पाटील | Published: February 1, 2024 06:49 PM2024-02-01T18:49:07+5:302024-02-01T18:49:55+5:30
बदलापूर रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली जाणार असून या विकास कामांमुळे फलट क्रमांक एक बंद करण्याची वेळ येणार आहे.
बदलापूर: बदलापूर रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली जाणार असून या विकास कामांमुळे फलट क्रमांक एक बंद करण्याची वेळ येणार आहे. मात्र वाढत्या गर्दीच्या अनुषंगाने स्थानकात चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी काही प्रमाणात तडजोड करावी लागणार आहे. बदलापूर स्थानकाचा कायापालट होणार असून प्रवाशांनी काही निर्णयाबाबत सकारात्मक रहावं असा आवाहन केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील यांनी केला आहे.
बदलापूर रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक एक आणि दोन यांची रुंदी कमी असल्यामुळे रेल्वे पादचारी पुलाच्या कामात अडथळा येणार होता. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने जास्तीत जास्त सुविधा देत असताना आता फलट क्रमांक एक बंद करून त्या ठिकाणी प्रवाशांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला आहे. फलाट क्रमांक एक बंद होणार असल्याने काही प्रमाणात प्रवाशांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. मात्र तांत्रिकदृष्ट्या सुविधा देत असताना स्थानकामध्ये काही प्रमाणात तडजोडी कराव्या लागत असल्याची बाब समोर आली आहे. रेल्वे स्थानकातील फलट क्रमांक एक बंद होत असले तरी संपूर्ण बदलापूर रेल्वे स्थानकात ज्या सुविधा मिळत आहेत त्या सुविधा प्रवाशांसाठी उपयुक्त ठरतील अशी भावना आता भाजपाचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहे.
भाजपाचे माजी नगराध्यक्ष राजन घोरपडे यांनी या सर्व कामांचा आढावा घेतला असून बदलापूर रेल्वे स्थानकात 11 ठिकाणी सरकते जिने, तीन लिफ्ट आणि मोठा पादचारी फुल उभारला जाणार असून त्यासाठी 36 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती दिली. स्थानकाचा कायापालट करत असताना काही ठिकाणी प्रवाशांनी देखील सहकार्य करावे अशी माफक अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे कपिल पाटील यांनी देखील बदलापूर स्थानकात होणाऱ्या विकास कामांचा आढावा देत भविष्यात बदलापूर स्थानकात प्रवाशांना कमीत कमी त्रास कसा होईल त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात विकास कामे केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे प्रवाशांमध्ये मात्र नाराजीचा सूर कायम असून बदलापूर स्थानकातील स्टेशनचा विकास करताना नेहमीच अडथळा येतो अशी भावना रेल्वे प्रवाशांनी व्यक्त केली आहे.