- अरुणकुमार मेहत्रे
राज्यातील जिल्हा परिषदांंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. प्राधान्यक्रम करण्यास बदली पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे मे २०२२ मध्ये होणा-या शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया शैक्षणिक सत्र संपत आले तरी अद्याप झालेल्या नाहीत. ही बदली प्रक्रिया पूर्ण होऊन बदली आदेश निर्गमित होण्यासाठी नवीन वर्षातील फेब्रुवारी २०२३ उजडणार आहे.
मागील दोन वर्षापासून कोरोना कारणाने शिक्षकांची आंतरजिल्हा आणि जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया थंडावली होती. बदली इच्छुक शिक्षकांनी बदली प्रक्रिया सुरु करण्याबाबत वारंवार शासनाकडे पाठपुरावा सुरु केला होता. त्यानंतर शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली पार पडली त्यानुसार पनवेल तालुक्यातून १२ शिक्षकांची बदली झाली आहे . तर बाहेर जिल्ह्यातून केवळ ७ शिक्षक पनवेल तालुक्यात आले झाले आहेत. पुढील टप्पा जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेचा होता. आंतरजिल्हा बदली उशिराने पार पडल्याने जिल्हांतर्गत बदल्यासाठी उशीराने सुरुवात झाली आहे. जिल्हांतर्गत बदलीसाठी पनवेल तालुक्यातील २४३ शिक्षक पात्र आहेत. त्यात सुगम म्हणजे सर्वसाधारण क्षेत्रातील २१८ शिक्षक आहेत. तर दुर्गम , अवघड क्षेत्रातील २५ पात्र शिक्षकांच्या याद्या प्रसिध्द झाल्या आहेत. या बदल्या नोव्हेंबरमध्येच होणे अपेक्षित असताना वर्ष संपत आले तरी बदली प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे या बदल्या नवीन वर्षात फेब्रुवारी महिन्यात होतील असे समजते आहे.शैक्षणिक वर्ष संपत आले तरी बदली प्रक्रिया संपत नसल्याने शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे.
२४३ शिक्षकांची जिल्हांतर्गत बदली होणार एकाच क्षेत्रात दहा वर्ष आणि एकाच शाळेवर पाच वर्षे अशा शिक्षकांचा जिल्हांतर्गत बदलीसाठी पात्र होतात. त्यानुसार पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेचे सर्वसाधारण क्षेत्र आणि दुर्गम व अघड क्षेत्रातील १५४ शाळेतील २४३ शिक्षक बदली पात्र आहेत. शिक्षकांच्या याद्या प्रसिध्द झाल्या असून नवीन वर्षात बदलीचे संकेत मिळत आहेत.
ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेस खूप विलंब लावला आहे. किमान आता तरी दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे अंमलबजावणी व्हावी. दर वर्षी बदली प्रक्रिया व्हावी लागते. मात्र गेल्या दोन वर्षापासून शिक्षकांच्या बदली झालेल्या नाहीत. आताही जिल्हांतर्गत बदलीस विलंब होत असल्याने शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. - सुभाष भोपी , जिल्हाध्यक्ष , महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ