गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
By नामदेव मोरे | Published: November 16, 2024 07:12 PM2024-11-16T19:12:39+5:302024-11-16T19:13:00+5:30
नोकरी व्यवसायानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या नागरिकांनी या ठिकाणी ऐरोली व बेलापूर मतदारसंघामध्ये नावनोंदणी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये ७३ हजार २३२ दुबार मतदारांची नोंदणी झाली आहे. राज्यातील १० मतदार संघामध्ये हे मतदार विभागले आहेत. विधानसभेला एकच मतदार दोन ठिकाणी मतदान करण्याची किंवा एक ठिकाणी बोगस मतदान होण्याची शक्यता आहे. मतदानाचा हा घोळ थांबविण्यात यावा अशी मागणी शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख किशोर पाटकर यांनी निवडणूक विभागाकडे केली आहे. दोन वेळा मतदान करणारांवर गुन्हे दाखल करण्याचा व न्यायालयात धाव घेण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
नोकरी व्यवसायानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या नागरिकांनी या ठिकाणी ऐरोली व बेलापूर मतदारसंघामध्ये नावनोंदणी केली आहे. यामधील अनेकांचे त्यांच्या मूळ गावातील मतदार यादीमध्येही नाव आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये गावाकडील उमेदवारांनी नवी मुंबईमध्ये मेळावे घेवून मतदारांना गावाकडे या, असे भावनिक आवाहन केले आहे. मतदार गावाकडे गेले तर त्याचा परिणाम ऐरोली व बेलापूरमधील उमेदवारांवर होण्याची शक्यता आहे. यामुळे सकाळी नवी मुंबईत मतदान करून सायंकाळपर्यंत गावाकडे जावून मतदान करायचे किंवा सकाळी गावाकडे मतदान करून दुपारी नवी मुंबईत मतदानाला यायचे किंवा दोन पैकी एक ठिकाणी बोगस मतदान करायचे, असे नियोजन अनेकांनी केले आहे.
शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख किशोर पाटकर यांनी नवी मुंबई, सातारा व पुणे जिल्ह्यातील दहा मतदार संघातील संपूर्ण मतदान याद्यांचे सर्वेक्षण केले आहे. यामध्ये ऐरोलीमध्ये ४१ हजार ५४६ व बेलापूरमध्ये ३१ हजार ६८६ दुबार नावे आढळली आहेत. या सर्वांचे त्यांच्या मूळ गावातील मतदारयादीमध्ये नाव आहे. काहींचे ऐरोली व बेलापूर अशा दोन मतदार संघामध्ये नावे असल्याचे निदर्शनास आले आहे. पाटकर यांनी निवडणूक विभागाकडे याविषयी तक्रार केली आहे.
नवी मुंबईतील दोन मतदारसंघामध्ये तब्बल ७३ हजार २३२ दुबार मतदार आहे. यांची नवी मुंबई व मूळ गावातील मतदारयादीमध्ये नावे आहेत. काहींची ऐरोली व बेलापूर दोन्ही ठिकाणी नावे आहेत. मोठ्या प्रमाणात बोगस मतदान होण्याची शक्यता आहे. याविषयी कारवाई करावी. याबाबत आम्ही न्यायालयातही धाव घेणार आहे.
- किशोर पाटकर, बेलापूर जिल्हाप्रमुख शिंदे सेना
मतदारसंघनिहाय नवी मुंबईतील दुबार मतदारांचा तपशील
विधानसभा क्षेत्र - ऐरोली - बेलापूर
पाटण - ६११४ - ४४२३
वाई - ४५४३ - ३३७२
कोरेगाव - ३८९६ - ३३७२
कराड दक्षिण - ४५९५ - ३६२९
सातारा - ५००२ - ३५३०
जुन्नर - १७९५ - १६८८
आंबेगाव - १४९० - १३७४
भोर - ३२०३ - १८७८
बेलापूर - ३६८२ - ३६८२
ऐरोली - ७२२६ - ४८६६
एकूण - ४१५४६ - ३१६८६