छोट्या विकासकांनाही आता मिळणार व्यवसायाची संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 11:28 PM2020-12-29T23:28:01+5:302020-12-29T23:28:07+5:30
नवी मुंबईतील भूखंडांची सर्वस्वी मालकी सिडकोकडे आहे.
कमलाकर कांबळे
नवी मुंबई : प्रस्थापित बडे गुंतवणूकदार आणि विकासकांची मक्तेदारी मोडीत काढत कमी भांडवल असलेल्या छोट्या विकासकांनाही संधी देण्याचे सिडको व्यवस्थापनाने ठरविले आहे. त्यानुसार छोट्या विकासकांच्या आर्थिक मर्यादा लक्षात घेऊन यापुढे ३०० ते ४००० चौरस मीटर क्षेत्रफळाचे भूखंड विक्रीसाठी काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी घेतला आहे. पहिल्या टप्प्यात घणसोली आणि नवीन पनवेल येथे लहान क्षेत्रफळाचे भूखंड विक्रीसाठी काढण्यात आले आहेत.
नवी मुंबईतील भूखंडांची सर्वस्वी मालकी सिडकोकडे आहे. त्यामुळे खासगी विकासकांची संपूर्ण मदार सिडकोकडून मिळणाऱ्या भूखंडांवर असते. सिडको निविदा काढून भूखंडांची विक्री करते. व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून सिडकोने आतापर्यंत मोठ्या आकाराचेच भूखंड विक्रीसाठी काढले. या निविदा प्रक्रियेत नेहमीच हजारो कोटींची उलाढाल असलेल्या प्रस्थापित विकासकांचाच बोलबाला राहिला. बोली लावून खरेदी केलेल्या भूखंडांचे नंतर ट्रेडिंग सुरू झाले. त्यामुळे भूखंडांच्या किमतीही गगनाला भिडल्या.
परिणामी, घरांच्या किमतीही वाढल्याने सर्वसामान्य ग्राहकांची परवड सुरू झाली. या स्पर्धेत छोट्या विकासकांचे मरण झाले. मोठ्या क्षेत्रफळाचे भूखंड घेण्याची आर्थिक क्षमता नसल्याने अनेकांनी बांधकाम व्यवसाय गुंडाळून इस्टेट एजेन्सीचा पर्याय निवडला. परिणामी, सिडको दरबारी शहरातील काही मोजक्या विकासकांचाच दबदबा राहिला. यातूनच भूखंडांचे श्रीखंड लाटण्याच्या खेळाला सुरुवात झाली. प्रस्थापित बिल्डर्स व सिडकोतील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी संगनमताने कोट्यवधी रूपयांचे भूखंड लाटले.
वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या प्रकाराला प्रतिबंध घालण्याचा सकारात्मक निर्णय सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी घेतला आहे. त्यानुसार नवी मुंबई, पनवेल परिसरातील छोट्या विकासकांना त्यांच्या आर्थिक क्षमतेनुसार भूखंड उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा शुभारंभही करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात घणसोली आणि नवीन पनवेल येथे लहान क्षेत्रफळाचे भूखंड विक्रीसाठी काढले आहेत. प्रत्येक नोडमधील उपलब्ध भूखंडांचा आढावा घेऊन येत्या काळात आणखी भूखंड विक्रीसाठी उपलब्ध केले जाणार असल्याचे डॉ. संजय मुखर्जी यांनी स्पष्ट केले आहे.
व्यावसायिक धोरणाला बगल
भूखंड विक्री हा सिडकोच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. त्यामुळे मागील काळात काहीसे व्यावसायिक धोरण अवलंबत सिडकोने भूखंड विक्रीवर अधिक भर दिला. परंतु आता या धोरणाला काही प्रमाणात बगल देत सर्वसामान्यांच्या हितावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या काळात छोट्या विकासकांचाही विचार केला जाणार आहे. तसेच गरजेनुसार स्वतंत्र बंगला व रोहाउस बांधू इच्छिणाऱ्यांनाही त्यांच्या आर्थिक क्षमतेनुसार भूखंड उपलब्ध करून देण्याचा सिडको विचार करीत आहे.