महिलांचे सामनेही सोडले नाहीत, सट्टेबाजांची विकेट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 08:49 AM2023-03-08T08:49:51+5:302023-03-08T08:50:32+5:30
डी. वाय. पाटील मैदानातच केली अटक
नवी मुंबई : नेरूळ येथे सुरू असलेल्या महिला क्रिकेट सामन्यावेळी सट्टा चालविणाऱ्या सहा जणांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर नेरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, त्यांच्याकडून २ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. स्टेडियममध्ये उपस्थित राहून मोबाइलवर सट्टा लावत असताना त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
नेरूळच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर महिलांचे क्रिकेट सामने खेळले जात आहेत. त्यानुसार शनिवारी पहिलाच सामना गुजरात गिंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जात होता. त्यासाठी स्टेडियममध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त लावला होता.
यादरम्यान स्टेडियममध्ये काही जण मोबाइलवर सट्टा लावत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक माणिक नलावडे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक उत्तम घेगडमल, गंगाधर देवडे, महेश पाटील, अनिल यादव, विष्णू पवार यांचे पथक केले होते. त्यांनी वेगवेगळ्या दोन ठिकाणी जमलेल्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील मोबाइल तपासले. त्यामध्ये ते सामन्याच्या ऑनलाइन नोंदी ठेवत असल्याचे आढळून आले.
हे आहेत सट्टेबाज
अंकितकुमार हिंगड, सौरभ नराणीवाल, सुरेंद्रसिंग देवपूर, आयुशकुमार हिंगड, नितेश मेहता, पिंटुकुमार टेलर, हरचरणसिंग अरोरा व मनजीतसिंग अरोरा अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून सामन्याचे तिकीट, सट्ट्यासाठी वापरलेले मोबाइल व दीड लाखाची रोकड असा एकूण २ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
आरोपी हरयाणा व राजस्थानचे
अटक केलेले सर्व जण हरयाणा व राजस्थानचे आहेत. महिला क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन सट्टा लावून सट्टा लावणाऱ्यांना सामन्यांची माहिती पुरवण्यासाठी ते नवी मुंबईत आले होते. त्यानुसार स्टेडियममध्ये उपस्थित राहून ते सट्टा लावत होते. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे पहिल्याच सामन्यात त्यांचीच विकेट पडली.