... तरीही बहुजन विकास आघाडीने घाम फोडला
By admin | Published: May 11, 2015 01:16 AM2015-05-11T01:16:25+5:302015-05-11T01:16:25+5:30
गेली चार दशके काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची यंदा सर्वपक्षीय सहकार पॅनलने एकत्रित येऊन निवडणूक लढविली.
मतदारांनीही दाखविली दिग्गजांना जागा : अध्यक्षपदाच्या निवडणुकीत घोडेबाजाराला येणार ऊत
जितेंद्र कालेकर, ठाणे
गेली चार दशके काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची यंदा सर्वपक्षीय सहकार पॅनलने एकत्रित येऊन निवडणूक लढविली. तरीही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या बंडखोरांना सोबत घेऊन बहुजन विकास आघाडीने दिग्गजांना चांगलाच घाम फोडला. सर्वाधिक जागा जिंकूनही ‘सहकार’च्या नेत्यांना आता आपल्याच बंडखोर आणि अपक्षांशी ‘हातमिळवणी’ करावी लागणार आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीला घोडेबाजारही चांगलाच तेजीत होण्याची चिन्हे आहेत.
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या या बँकेची ५ मे रोजी निवडणूक झाली. गुरुवारी भल्याभल्यांना मतदारांनी कशी जागा दाखविली, हे पाहायला मिळाले. गेली ४० वर्षे बँकेवर संचालक आणि १९८६ ते १९९६ या १० वर्षांच्या काळात बँकेवर अध्यक्ष असलेले आर.सी. पाटील यांचा मुलगा अरुण पाटील यांच्या पराभवाने भाजपाच्याही प्रतिष्ठेला धक्का बसला. शिवसेनेचे बंडखोर अनिल मुंबईकर यांनी त्यांचा २०२ मतांनी पराभव केला. दुसरा धक्कादायक निकाल म्हणजे राष्ट्रवादी ठाणे ग्रामीणचे अध्यक्ष दशरथ तिवरे यांचा लागला. त्यांचा पराभव आमदार पांडुरंग बरोरा यांचे कट्टर समर्थक कैलास पडवळ यांनी केला. तिवरे आणि बरोरा यांच्या वादामुळे तिथे पडवळ उभे राहिले. दरम्यान, तिवरेंच्या आजारपणामुळे त्यांना प्रचारातही उतरता आले नाही आणि त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. राष्ट्रवादीच्या अनंत शिसवे यांनाही प्रमोद हिंदुराव यांचे समर्थक बंडखोर म्हणून उभे राहिलेले अपक्ष कपिल थळे यांनी पराभूत केले.
गेली ४० वर्षे संचालक असलेल्या मस्तान फिलीप यांचाही अवघ्या ४६ मतांनी अशोक पोहेकर यांनी पराभव केला. त्यांचा निसटता पराभव झाल्याने हा एका अर्थाने पोहेकरांनाही इशारा असल्याचे मानले जाते. भाजपाचे खासदार कपिल पाटील यांचे पुतणे प्रशांत यांनीही बँकेचे माजी अध्यक्ष कमलाकर टावरेंचा पराभव करून कपिल पाटील यांची बूज राखली. शिवाय, जायंट किलर म्हणूनही नाव मिळविले. ‘सहकार’च्या भाऊ कुऱ्हाडेंचा २३६ मतांनी दणदणीत विजय झाला आहे.
स्पष्ट बहुमत ‘सहकार पॅनल’कडे असले तरी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अपक्षांना चांगलाच ‘भाव’ मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यंदा प्रथमच सर्वपक्षीयांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. तरी, बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आमदार हितेंद्र ठाकूर यांनी राष्ट्रवादीतील बँकेचे माजी अध्यक्ष शिवाजी शिंदे यांना हाताशी धरुन राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेतील बंडखोरांच्या मदतीने आखलेल्या रणनीतीतून ११ पैकी दोन महिलांसह सहा जागांवर विजय मिळविला.
आणखी संचालक आपल्या बाजूनेच असतील, असा विश्वास या ‘लोकशाही सहकार’कडून व्यक्त केला जात आहे. हाच विश्वास ‘सहकार’ पॅनलच्या नेत्यांनीही व्यक्त केला आहे. त्यामुळे दोन्ही गटांकडून अपक्षांना हेरण्याची व्यूहरचना केली जाणार आहे. घोडेबाजारही होणार असल्यामुळे आगामी १२ ते १३ दिवसांत होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे सर्वच पक्षांच्या नेत्यांचे लक्ष लागले आहे.
आघाडी, युती तरी...
एकीकडे राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि भाजपा अशी आघाडी आणि युतीचे ‘सहकार’ पॅनल आणि दुसरीकडे राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेतील बंडखोर आणि बहुजन विकास आघाडी यांचे ‘लोकशाही सहकार’ पॅनल. तरीही, या पॅनलने सर्वच भल्याभल्यांची हवा टाइट केली. त्यामुळे आठ बिनविरोध आणि अधिक तीन अशा ११ जागा जिंकूनही ‘सहकार’च्या संचालकांध्ये जल्लोषाऐवजी अस्वस्थताच अधिक दिसत होती.
महिलांचा पराभवही ‘सहकार’च्या जिव्हारी
महिला राखीवमधूनही राष्ट्रवादीच्या भावना डुंबरे आणि विद्या वेखंडे यांचा पराभव ‘सहकार’मधील पॅनलच्या नेत्यांना चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यांच्याऐवजी संचालकपदाच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या सुनीता दिनकर आणि दोनदा पराभूत झालेल्या रेखा पष्टे या विजयी झाल्या आहेत. चार वेळा तिकीट मागूनही पक्षाने विचार केला.