- प्रशांत माने, कल्याणसोयीसुविधांअभावी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या बहुतांश शाळांचा दर्जा खालावला असला तरी काही शाळांमध्ये पोषक वातावरण असूनदेखील पटसंख्या समाधानकारक नसल्याचे वास्तव आहे. असेच चित्र डोंबिवली पश्चिमेकडील कुंभारखाणपाडा परिसरातील संत नामदेव प्राथमिक विद्यालयात दिसते. या शाळेत सद्य:स्थितीला पटसंख्या ४० इतकी असून मागील वर्षी ती ५० इतकी होती. बालवाडीत २५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. परंतु, प्रत्यक्षात १० ते १५ जणच शाळेत उपस्थित असतात. इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत असून तीन शिक्षक कार्यरत आहेत. पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही सुविधा येथे मिळत नाहीत. शाळेसाठी दिलेल्या दोनपैकी एकच संगणक चालू अवस्थेत आहे. प्रशिक्षकाअभावी संगणकीय ज्ञानाची जबाबदारीदेखील शिक्षकांवरच आहे.शाळेसाठी कसे चांगले वातावरण असावे, याची प्रचीती ही शाळा पाहता येते. चाळटाइप वास्तू आणि छतावर पत्र्याची शेड अशा स्वरूपात ही शाळा असली तरी सुसज्ज वर्गखोल्या, रेखाटलेले सुविचार आणि कर्तृत्वाने समाजात ठसा उमटविणाऱ्या राष्ट्रीय पुरुषांची छायाचित्रे येथील भिंतींवर आहेत. सफाई कर्मचाऱ्यांअभावी शाळेच्या स्वच्छतेची जबाबदारी विद्यार्थी आणि शिक्षकांवर येऊन ठेपली असली तरी शाळेचा परिसर स्वच्छ आहे. लहान मुलांना शाळेची ओढ लागावी म्हणून कॅरम, घसरगुंड्या महिला व बालकल्याण विभागाने उपलब्ध करून दिल्या आहेत. शाळेची मूळ वास्तू १९४८ सालातील आहे. मागील वर्षीच तिचे नूतनीकरण केले आहे. चांगल्या वातावरणात आपली मुले शिकतात, याचे समाधान पालकांना आहे.
वातावरण पोषक असूनही पटसंख्या असमाधानकारकच
By admin | Published: July 16, 2015 11:41 PM