नवी मुंबई : महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांचे यंदाचे शैक्षणिक वर्ष शालेय गणवेशाविनाच सुरु झाले आहे. डीबीटी धोरणाकडे पालकांनी पाठ फिरविल्याने महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून यंदा ई-रुपी प्रणाली राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु आता तब्बल निम्मे शैक्षणिक वर्ष संपले तरी विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश आणि शैक्षणिक साहित्य मिळाले नाही. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षी पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश आणि शैक्षणिक साहित्य मिळणार का असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.नवी मुंबई शहरात विविध खाजगी संस्थांच्या शाळा आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध सुविधा आणि शिक्षण महापालिका शाळेत शिक्षण घेणाऱ्या शहरातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना मिळाव्यात यासाठी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून शाळांच्या प्रशस्त इमारती उभारल्या आहेत. या शाळांमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू आदी माध्यमाच्या आणि सीबीएसई बोर्डाच्या शाळा देखील सुरु केल्या आहेत. यामुळे महापालिका शाळांमध्ये दरवर्षी विद्यार्थ्यांची पटसंख्या देखील वाढत आहे. पालिका शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गणवेशासह शैक्षणिक साहित्य देखील पुरविण्यात येते. शैक्षणिक वर्ष २०१४ -१५ मध्ये शासनाच्या माध्यमातून डीबीटी धोरण राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
शैक्षणिक वर्ष २०१६ -१७ पासून नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून या धोरणाच्या अंलबजावणीला सुरुवात केली आहे. परंतु या धोरणाला पालकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने यंदा प्रशासनाने ई -रुपी प्रणाली राबविण्याचा निर्णय घेतला होता. यावर काम देखील सुरु केले होते. त्यामुळे पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना यंदा तरी लवकर गणवेश आणि शालेय साहित्य उपलब्ध होईल अशी शक्यता निर्माण झाली होती. परंतु निम्मे शैक्षणिक वर्ष संपले तरी विद्यार्थ्यांना अद्याप शैक्षणिक साहित्य आणि गणवेश उपलब्ध झालेले नाहीत. त्यामुळे यंदा महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार का असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.
डीबीटी धोरणाला पालकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने यंदा ईरुपी प्रणाली राबविण्यात येत आहे. इरुपी प्रणाली राबविणारी नवी मुंबई महानगर पालिका हि पहिली असून याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना पुढील महिन्यात गणवेश आणि शैक्षणिक साहित्य मिळेल.राजेश नार्वेकर, आयुक्त, न.मुं.म,पा.
प्राधान्यक्रम कशाला द्यावा हे जर कळत नसेल तर प्रशासनाचेच नाही तर राज्य सरकारचे देखील अपयश आहे. महापालिकेच्या शाळेत गोर -गरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेतात यांनी या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रशासनाने खेळ मांडला आहे.सुधाकर सोनावणे, माजी महापौर