Devendra Fadnavis: 'आजही मीच मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं', देवेंद्र फडणवीसांनी सांगितली 'मन की बात'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 02:18 PM2021-10-12T14:18:25+5:302021-10-12T14:20:01+5:30
Devendra Fadnavis: मला आजही मीच राज्याचा मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं असं विधान राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
मला आजही मीच राज्याचा मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं असं विधान राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं आहे. नवी मुंबईत आयोजित महिला मासळी विक्रेता परवाना वितरण समारंभासाठी उपस्थित होते. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना फडणवीसांनी आजही आपणच राज्याचे मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं, असं म्हटलं आहे.
"माझ्या पाठिशी भाजपचे सर्व नेते उभे आहेत. सर्वजण माझ्या पाठिशी असल्यामुळे मला एकही दिवस असं जाणवलं नाही की मी मुख्यमंत्री नाही. मला असं वाटतं मी आजही मुख्यमंत्रीच आहे. तुम्ही मला त्याची कमतरता जाणवू दिली नाही. शेवटी मनुष्य कुठल्या पदावर आहे हे महत्त्वाचं नाही. तो काय काम करतो हे महत्त्वाचं आहे. गेले दोन वर्ष एकही दिवस घरात न थांबता मी जनतेच्या सेवेमध्ये आहे. त्याच्यामुळे मला कधीही जनतेनंही हे जाणवू दिलं नाही की मी मुख्यमंत्री नाही", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
"राज्याचा विरोधी पक्षनेते म्हणून मी चांगलं काम करतो आहे. ज्या दिवशी आशीर्वाद मिळेल त्यादिवशी पहिल्यांदा मी इथंच गोवर्धनी मातेजवळच आशीर्वाद घ्यायला येणार आहे. त्यामुळे त्याची काळजी करण्याचं काही कारण नाही. मी नक्की याठिकाणी येईन आणि तुमचं निमंत्रण मी आजच स्वीकारतो", असंही फडणवीस पुढे म्हणाले.
नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? पाहा व्हिडिओ...
Live | महिला मासळी विक्रेता परवाना वितरण समारंभ | नवी मुंबई @mandamhatrehttps://t.co/fkMGgkAI3U
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 12, 2021
बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या स्थानिक विकास निधीतून उपलब्ध करण्यात आलेल्या विविध सेवासुविधांचे फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. त्याप्रसंगी फडणवीस बोलत होते. यावेळी आमदार मंदा म्हात्रे यांच्यासह ऐरोलीचे आमदार गणेश नाईक, विधान परिषदेचे आमदार रमेश पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माथाडी नेते नरेंद्र पाटील आदी उपस्थित होते.