प्रत्येक भारतीय नागरिकाला हवी संविधानाची माहिती
By admin | Published: November 30, 2015 02:28 AM2015-11-30T02:28:15+5:302015-11-30T02:28:15+5:30
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने संविधान दिनाचे औचित्य साधून विष्णुदास भावे नाट्यगृह येथे महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यातिथीनिमित्त शनिवारी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने संविधान दिनाचे औचित्य साधून विष्णुदास भावे नाट्यगृह येथे महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यातिथीनिमित्त शनिवारी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना विविधतेतही एकता जपणारा ग्रंथ म्हणजेच भारतीय संविधान आणि या देशाचा एक नागरिक म्हणून प्रत्येकाला या संविधानाची माहिती असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांनी केले. संविधानाचे महत्त्व व नागरिकांची जबाबदारी याविषयी उपस्थितांशी डॉ. जाधव यांनी संवाद साधला.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आंभिरा सामाजिक संस्थेच्या सहयोगाने संविधान दिनानिमित्त २६ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रातील दुर्मीळ छायाचित्रांच्या तसेच विष्णुदास भावे नाट्यगृहात त्यांच्या हस्ताक्षरातील पत्रव्यवहाराची छायाचित्रे आणि त्यांनी वापरलेल्या साहित्याची छायाचित्रे याच्या प्रदर्शनाला तीन दिवसांत हजारो नागरिकांनी भेट दिली असून, डॉ. नरेंद्र जाधव यांनीही प्रदर्शनाला भेट देऊन या अभिनव उपक्र माचे कौतुक केले. डॉ. नरेंद्र जाधव यांचे बोधप्रद विचार ऐकण्यासाठी विष्णुदास भावे नाट्यगृहात त्यांनी म्हटल्याप्रमाणे दर्दींची उदंड गर्दी होती.
आपले संविधान, आपला आत्मसन्मान ही भूमिका विशद करताना नागरिकांना संविधानामुळे प्राप्त झालेल्या अधिकारांबरोबरच आपल्या सम्यक कर्तव्याची जाणीव होणे गरजेचे आहे. याकरिता दहावीपर्यंत अभ्यासक्र मात नागरिकशास्त्र हा विषय अनिवार्य करण्यात यावा आणि त्यामध्ये ५० टक्के भाग संविधानावर आधारित असावा, असे मत मांडत नरेंद्र जाधव यांनी संविधानाचे महत्त्व जनमानसात प्रसारित होण्याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेने हा विशेष कार्यक्र म आयोजित करून घेतलेल्या पुढाकाराबद्दल कौतुक केले.
सुजाण नागरिक म्हणवून घेण्यासाठी भारतीय संविधानाची किमान माहिती प्रत्येकाला असायला हवी, असे सांगत उद्देशिका अर्थात सरनामा हा भारतीय संविधानाचा आत्मा असून, कमीत कमी शब्दांत प्रभावी आशय मांडणारी उद्देशिका सर्वोत्तम प्रभावी रचना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे, उपमहापौर अविनाश लाड, स्थायी समिती सभापती नेत्रा शिर्के, महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे, सभागृह नेता जयवंत सुतार आदी उपस्थित होते.