नाटकातील प्रत्येक शब्द लोकांमध्ये पोहोचावा
By admin | Published: January 11, 2017 06:26 AM2017-01-11T06:26:21+5:302017-01-11T06:26:21+5:30
नाटकातील प्रत्येक शब्द लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, असे मत व्यक्त करून भाषेवर विशेष लक्ष द्या, असे आवाहन ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर
पनवेल : नाटकातील प्रत्येक शब्द लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, असे मत व्यक्त करून भाषेवर विशेष लक्ष द्या, असे आवाहन ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांनी येथे केले. अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते.
अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद पनवेल शाखा आणि चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मुंबई व कोकण विभागस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारीआद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झाला. ९७व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सावरकर यांचा या समारंभात समस्त पनवेलकरांच्या वतीने सत्कार व अभिनंदन करण्यात आले. या वेळी ते म्हणाले, ‘जो तो माझ्या वयाबद्दल बोलतो. मात्र, शेवटच्या श्वासापर्यंत रंगभूमीवर काम करण्याची उमेद आहे,’ असे भावोद्गार सावरकर यांनी काढले.
समारंभास लेखक व समीक्षक प्रा. नितीन आरेकर, दिग्दर्शक महेंद्र तेरेदेसाई, अभिनेते भरत सावले, जयवंत वाडकर, समीर खांडेकर, नाट्यनिर्मात्या कल्पना कोठारी, गझलकार ए. के. शेख, अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष परेश ठाकूर, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. टी. गडदे, प्रमुख कार्यवाह श्यामनाथ पुंडे, नगरपरिषदेचे माजी सभापती अनिल भगत, माजी नगरसेवक प्रथमेश सोमण आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. नितीन आरेकर म्हणाले, ‘नाटकाचे अस्तित्व आपल्या सर्वांच्या शरीरात आहे. हा धागा व्रताप्रमाणे सांभाळून मनातील नाटक अटल असू द्या. दिग्दर्शक महेंद्र तेरेदेसाई यांनी, कलाकारांनी इतर कलाकृती पाहण्याची सवय लावून घ्यायला हवी, असे सांगितले. (वार्ताहर)