नवी मुंबई : सोमवारी होणाऱ्या विधानसभेच्या मतदानाच्या अनुषंगाने रविवारी प्रत्येक मतदान केंद्रासाठी ईव्हीएम मशिनचे वाटप करण्यात आले. त्यानुसार ऐरोली विधानसभेची ही प्रक्रिया ऐरोलीतील सरस्वती विद्यालयात तयार केलेल्या स्ट्राँगरूममधून राबवण्यात आली. त्या ठिकाणावरून चोख पोलीस बंदोबस्तामध्ये ८२ केंद्रातील ४४० मतदान केंद्रासाठी ईव्हीएम मशिन रवाना करण्यात आली.
रविवारी सकाळी ७ वाजता या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली होती. मात्र, रात्रीपासूनच पावसाची रिमझिम सुरू असल्याने त्यात अडचणी निर्माण होत होत्या. अखेर दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ४४० मतदान केंद्रावर ईव्हीएम मशिन, व्हीव्हीपॅट व बॅलेट युनिट रवाना करण्यात आले. ऐरोली विधानसभा क्षेत्रातील ८२ इमारतींमध्ये ही ४४० केंद्र आहेत. त्याकरिता पोलिसांचाही चोख बंदोबस्त नेमण्यात आला होता.
विभागीय निवडणूक अधिकारी अभय करगुटकर यांच्या देखरेखीखाली ही प्रक्रिया पार पडली. मतदानाच्या वेळी अनपेक्षितपणे एखादी मशिन बंद पडल्यास पर्यायी सोय म्हणून दहा टक्के ईव्हीएम मशिन राखीव ठेवण्यात आल्या आहेत. रविवारी दुपारी प्रत्येक मतदान केंद्रावर ईव्हीएम मशिन पोहोचल्यापासून त्या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. हा बंदोबस्त सोमवारी रात्री मतदान संपल्यानंतर सर्व मशिन सिल करून त्या स्ट्राँगरूमपर्यंत पोहोचवल्या जाईपर्यंत राहणार आहे.