माजी महापौरांनी मोरबेत धुतला प्रसिद्धीचा हात; प्रशासनाच्या अनुमतीशिवाय केले जलपूजन 

By सूर्यकांत वाघमारे | Published: September 24, 2023 07:16 PM2023-09-24T19:16:13+5:302023-09-24T19:17:18+5:30

जलपूजन अधिकृत नसून त्यांना धरण क्षेत्रात प्रवेश मिळाला कसा? याची चौकशी केली जाईल असे पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सांगितले. 

ex mayor performed jal pujan in morbe dam without the permission of the administration | माजी महापौरांनी मोरबेत धुतला प्रसिद्धीचा हात; प्रशासनाच्या अनुमतीशिवाय केले जलपूजन 

माजी महापौरांनी मोरबेत धुतला प्रसिद्धीचा हात; प्रशासनाच्या अनुमतीशिवाय केले जलपूजन 

googlenewsNext

सूर्यकांत वाघमारे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : मोरबे धरण पूर्ण भरताच रविवारी तीन माजी महापौरांनी त्याठिकाणी परस्पर जलपूजन उरकल्याचा प्रकार समोर आला. धरण शंभर टक्के भरल्याची आनंदाची बातमी प्रशासनाकडून प्रसिद्ध करताच राजकारण्यांनी त्याठिकाणी पूजेचा घाट घातला. दरम्यान त्यांच्यामार्फत झालेले जलपूजन अधिकृत नसून त्यांना धरण क्षेत्रात प्रवेश मिळाला कसा? याची चौकशी केली जाईल असे पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सांगितले. 

नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणातील पाण्याने शनिवारी रात्री अत्युच्च पातळी गाठली. दोन वर्षानंतर यंदा धरण क्षेत्रात झालेल्या पुरेशा पावसामुळे धरणातील पाण्याने उच्च पातळी गाठली आहे. यामुळे नवी मुंबईकरांना पुढील वर्षभर मुबलक जलसाठा उपलब्ध झाला आहे. नवी मुंबईकरांना दिलासा देणारी हि माहिती रविवारी सकाळी प्रशासनाकडून उघड करण्यात आली. त्यामुळे लवकरच प्रशासनाकडून त्याठिकाणी जलपूजनाचा कार्यक्रम केला जाणार होता. त्यापूर्वीच माजी महापौरांची फौज धरणावर धडकून त्यांनी परस्पर जलपूजन उरकल्याचा प्रकार दुपारी समोर आला. माजी महापौर संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर सुधाकर सोनवणे यांच्यासह इतर काहींनी धरणावर जाऊन तिथली पाहणी केली.

शिवाय सोबत नेलेल्या पंडित मार्फत त्याठिकाणी जलपूजनाचा कार्यक्रम देखील उरकून टाकला. मात्र हे जलपूजन प्रशासनामार्फत झाले नसल्याचे पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे. तसेच धरण क्षेत्रात ते परस्पर गेले कसे ? याचीही चौकशी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावरून माजी महापौरांनी वाहत्या धरणात प्रसिद्धीचा हात धुवून घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अपघात टाळण्यासाठी धरणाच्या दरवाजा क्षेत्रात प्रशासनाच्या परवानगी शिवाय इतरांना जाण्यास मनाई आहे. यानंतरही प्रशासनाला कानोकानी खबर न होता राजकीय मंडळींनी त्याठिकाणी प्रवेश करून पूजा उरकल्याचेही आश्चर्य व्यक्त होत आहे.

मागील तीन वर्षांपासून निवडणूक झालेली नसल्याने राजकारण्यांची चलबिचलता वाढली आहे. त्यातच हा प्रकार घडल्याने गेल्या अनेक वर्षांपासून धरणाच्या पूजेची संधी न मिळाल्याने त्यांनी रविवारी डाव साधल्याची देखील चर्चा होत आहे. तर राजकीय व्यक्तींना धरण क्षेत्रात प्रवेश दिल्याप्रकरणी व तिथे पूजेचा घाट घातल्याप्रकरणी कोणावर कारवाई होईल का ?  याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: ex mayor performed jal pujan in morbe dam without the permission of the administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.