सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई : ताज ग्रुप ऑफ हॉटेल्सच्या माजी कर्मचाऱ्याला मानवी तस्करीच्या गुन्ह्याची भीती दाखवून ३७ लाखाला लुटल्याची घटना समोर आली आहे. मात्र या धक्क्याने त्यांना ब्रेनस्ट्रोक आला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
नेरुळ येथे राहणाऱ्या अलोककुमार शुक्ला यांच्यासोबत हि घटना घडली आहे. ते ताज ग्रुप ऑफ हॉटेल्समधून निवृत्त झाले असून पत्नीसह नेरूळमध्ये राहतात. गतमहिन्यात त्यांना एका व्यक्तीने फोन करून अलोककुमार यांच्यावर मानवी तस्करीचा गुन्हा दाखल असल्याचे सांगितले होते. तसेच या गुन्ह्याच्या चौकशीसाठी दिल्लीला येण्याचा तगादा लावला होता. अखेर फोनवरील व्यक्तींनी तडजोडीचा मार्ग दाखवत त्यांच्याकडे वेळोवेळी पैशाची मागणी करून तब्बल ३७ लाख रुपये उकळले आहेत.
त्यानंतरही कारवाईची भीती दाखवून त्यांच्याकडून पैशाची मागणी केली जात होती. तसेच या प्रकरणाबाबत कोणाला सांगितल्यास बदनामीची भीतीही दाखवली जात होती. गुन्हेगारांच्या या त्रासाने त्यांना ब्रेनस्ट्रोक आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती अद्यापही पूर्ववत न झाल्याने अखेर पत्नी रूपा शुक्ला यांनी पतीसोबत घडलेल्या घटनेची तक्रार पोलिसांकडे केली आहे. त्याद्वारे सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.