- प्राची सोनवणेनवी मुंबई : मुंबई युनिव्हर्सिटीचा निकालाचा घोळ झाल्याने गतवर्षी विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टीने अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. प्रवेशानंतर किमान ९० दिवसांनी अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर घेतल्या जाणा-या परीक्षा मात्र यंदा महिनाभरानंतरच घेतल्या जात असल्याने कायद्याचे धडे घेणा-या विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करायचा याचा पेच पडला आहे. अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही तरी मात्र परीक्षा कशा घेतल्या जातात, असा सवाल स्टुडंट लॉ कौन्सिल या विद्यार्थी संघटनेने केला आहे.येत्या २९ जानेवारीपासून मुंबई विद्यापीठाच्या प्रथम वर्ष एलएलबीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. मात्र प्रवेशाला ६० दिवस देखील पूर्ण झालेले नसताना या परीक्षा घेतल्या जात असल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांच्या वतीने केला जात आहे. पुनर्मूल्यांकनाला झालेली दिरंगाई त्यानंतर प्रवेशही उशिरानेच झाले, परिणामी अभ्यासवर्गालाही उशिरानेच सुरुवात झाली. आता कुठे प्रवेश घेऊन महिना उलटत नाही तोवर परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्याने विद्यार्थी आणि पालकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. शिल्लक अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आठवड्याच्या शेवटच्या दिवसांमध्येही जादा तासिका घेतल्या जात असून विद्यार्थ्यांना अतिरिक्त ताण दिला जात असल्याची तक्रार पालकांकडून केली जात आहे. या अगोदरही ५० टक्के विद्यार्थ्यांचा पुनर्मूल्यांकनाचा निकाल प्रलंबित राहिल्याने परीक्षा पुढे ढकलण्यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. एकदा परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या तर त्यानंतर वेळापत्रक बदलण्यात आले होते. प्रथम वर्षाच्या एलएलबीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न लक्षात घेता या परीक्षा जानेवारीऐवजी फेब्रुवारीत घ्याव्यात, अशी मागणी स्टुडंट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी केली. येत्या काहीच दिवसात एलएलबी प्रवेशाची चौथी यादी जाहीर केली जाणार आहे. परीक्षा पुढे ढकलल्या नाही तर आंदोलनात्मक भूमिका पुकारण्याचा इशारा विद्यार्थी संघटनेने दिला आहे. स्टुडंट लॉ कौन्सिल या विद्यार्थी संघटनेच्या वतीने विद्यापीठाच्या कुलगुरूंनाही यासंदर्भात निवेदन देण्यात आले असून, अजून उत्तर आलेले नाही याचा संताप व्यक्त केला जात आहे.मुंबई विद्यापीठाच्या मनमानी कारभारामुळे, तसेच मेरी ट्रॅक कंपनीला दिलेल्या टेंडरमुळे जो काही गोंधळ झाला त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. तसेच आताही विद्यापीठ प्रशासन फक्त परीक्षा घेण्याच्या मागे लागले आहे. ९० दिवसांचा परीक्षा कालावधी असणारा विद्यापीठाचा कायदा विद्यापीठ पाळत नाही याची खंत वाटते. आधी जो प्रकार घडला पुन्हा विद्यापीठ प्रशासनाकडून घडत आहे. याविरोधात आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या चुकीची शिक्षा विद्यार्थ्यांनी का सहन करावी ?- सचिन पवार,अध्यक्ष, स्टुडंट लॉ कौन्सिल
अभ्यासक्रम अपूर्ण असतानाही परीक्षा? विद्यार्थ्यांचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2018 2:27 AM