कोरोनाच्या काळात शाळेत बोलावून घेतली परीक्षा; पुढच्या वर्गात प्रवेश न देण्याचा दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 02:53 AM2020-07-04T02:53:56+5:302020-07-04T02:54:22+5:30
कोळखे येथील बेथनी शाळेतील प्रकार
अरुणकुमार मेहत्रे
कळंबोली : करोना संसर्गजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्याबाबतचा अद्याप निर्णय झालेला नाही, परंतु शासनाच्या नियमाला बगल देत, कोळखे येथील बेथनी कॉन्व्हेंट शाळेने पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतल्याची घटना शुक्रवारी समोर आली आहे. यामुळे करोना संसर्ग काळात शाळेकडून विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळले जात आहे.
परीक्षेबाबत पालकांना एसएमएसद्वारे कळवत पाल्यांना शाळेत पाठविण्यास सांगितले गेले. याला पालकांनी विरोध केल्यानंतर परीक्षेसाठी उपस्थित न राहिल्यास पाल्यास पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार नाही, असेही शाळेकडून सांगण्यात आल्याचे पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे काही पालक आपल्या पाल्यांना घेऊन शुक्रवारी शाळेत आले होते. शाळेत शिक्षणात कमी असणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली असल्याचे समजते आहे. याबाबत बेथनी कॉन्व्हेंट शाळेतील मुख्याध्यापकांशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.
शासनाकडून अद्याप शाळा, तसेच परीक्षा, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शाळेत बोलवण्यासाठी आदेश देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे बेथनी शाळेकडून परीक्षा घेण्यात आल्या असतील, तर चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल . - नवनाथ साबळे, गट शिक्षणाधिकारी पनवेल