वाशीतील पालिका रुग्णालयात मृतदेहाची अदलाबदली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 12:21 AM2020-05-19T00:21:50+5:302020-05-19T00:22:17+5:30
रुग्णालयात एकाच ठिकाणी दोन मृतदेह ठेवल्याने हा घोळ झाल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे दिघा येथील कुटुंबाला त्यांच्या मुलीच्या मृतदेहाऐवजी तरुणाचा मृतदेह देण्यात आला असून त्यांनीही अंत्यसंस्कार पार पाडले.
नवी मुंबई : वाशीतील पालिका रुग्णालयातून मृतदेह गहाळ झाल्या प्रकरणात मुस्लीम तरुणावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार झाल्याची बाब समोर आली आहे. रुग्णालयात एकाच ठिकाणी दोन मृतदेह ठेवल्याने हा घोळ झाल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे दिघा येथील कुटुंबाला त्यांच्या मुलीच्या मृतदेहाऐवजी तरुणाचा मृतदेह देण्यात आला असून त्यांनीही अंत्यसंस्कार पार पाडले.
उलवे येथील २९ वर्षीय तरुणाचा मृतदेह वाशी रुग्णालयातून गहाळ झाला होता. दिवसभराच्या तपासाअंती मृतदेहाची अदलाबदल झाल्याचे कळते. मयत तरुण हा मूळचा पश्चिम बंगालचा आहे. त्याचा आजारामुळे मृत्यू झाला असून कोरोना चाचणीसाठी ९ मेला त्याचा मृतदेह वाशीतील पालिका रुग्णालयात आणला होता.
त्याचदरम्यान दिघा येथील १८ वर्षीय मुलीचा कावीळने मृत्यू झाल्याने तिचाही मृतदेह तेथे आणला होता. परंतु दोघांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर १४ मे रोजी दोन्ही मयत तरुण व तरुणीच्या नातेवाईकांना मृतदेह ताब्यात घेण्यासाठी बोलवले होते. परंतु तरुणाच्या घरचे पश्चिम बंगालवरून त्या दिवशी वाशीला पोहचू शकले नाहीत. तर मुलीचे नातेवाईक मृतदेह घेण्यासाठी आले होते. यावेळी शवागारातील कर्मचाऱ्याने त्यांना मुलीच्या ऐवजी तरुणाचा मृतदेह दाखवून घाईमध्ये तो बंदिस्त करून अंत्यविधीसाठी ताब्यात दिला. मुलीच्या कुटुंबीयांनी तो स्वीकारून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तो बाहेर न काढता त्याच दिवशी हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले.
अखेर चार दिवसांनी त्यांना स्वत:च्या मुलीऐवजी अनोळखी तरुणाचा अंत्यविधी केल्याचे उघड झाले. उलवे येथील उमर शेख (२९) याचा मृतदेह असल्याचे चौकशी समितीच्या तपासात समोर आले. उमर याचा मृतदेह व दिघा येथील मुलीचा मृतदेह आजू बाजूला ठेवल्याने हा घोळ झाला. तर उमरचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी दोन दिवसांपूर्वी त्याचा भाऊ पालिका रुग्णालयात आला असता, मृतदेह बेपत्ता असल्याचे आढळून आले. त्याचा उलगडा करण्यासाठी पालिका आयुक्तांनी चौकशी समिती नेमली होती. त्यांच्याकडून सोमवारी दिवसभर चाललेल्या तपासात हि बाब समोर आल्याचे वाशी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजीव धुमाळ यांनी सांगितले. यामध्ये नेमका हलगर्जीपणा कोणाचा याचा तपास सुरू आहे.
अद्याप गुन्हा दाखल नाही
याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. परंतु मुलीच्या बदल्यात मुलाचा मृतदेह बदली झालाच कसा, असा प्रश्न उमरच्या भावाने उपस्थित केला आहे. पोलीस व चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर कारवाई करणर असल्याचे पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सांगितले आहे.