घणसोली-ऐरोली पामबीच मार्गाचा वनवास संपला; पन्नास टक्के खर्च उचलण्याच्या सिडकोच्या तयारीने तिढा सुटला

By कमलाकर कांबळे | Published: November 8, 2023 08:59 PM2023-11-08T20:59:41+5:302023-11-08T21:00:01+5:30

यासंबंधीच्या ठरावालाही संचालक मंडळाने मान्यता दिल्याने गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेला घणसोली पामबीच मार्गाचा ऐरोलीपर्यंतचा विस्तार दृष्टिपथात आला आहे.

Exile of Ghansoli-Airoli Pambeach route ends; CIDCO's readiness to bear 50 percent of the cost left the rift | घणसोली-ऐरोली पामबीच मार्गाचा वनवास संपला; पन्नास टक्के खर्च उचलण्याच्या सिडकोच्या तयारीने तिढा सुटला

घणसोली-ऐरोली पामबीच मार्गाचा वनवास संपला; पन्नास टक्के खर्च उचलण्याच्या सिडकोच्या तयारीने तिढा सुटला

नवी मुंबई : गेल्या अकरा वर्षांपासून रखडलेला घणसोली-ऐरोली पामबीच मार्ग आता दृष्टिपथात आला आहे. या प्रकल्पाच्या खर्चावरून सुरू असलेल्या वादावर पडदा पडला असून सिडकोने पन्नास टक्के खर्च करण्याची तयारी दर्शविली आहे. बुधवारी झालेल्या सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत या संबंधीच्या ठरावाला मंजुरी मिळाल्याची माहिती सिडकोच्या वरिष्ठ सूत्राने दिली.

घणसोली सेक्टर १४ ते ऐरोली सेक्टर १० ए यादरम्यानच्या साधारण दोन किमी लांबीच्या मार्गासाठी यापूर्वी २५० कोटी रुपये खर्च निश्चित केला होता. मात्र, पूर्वनियोजित या मार्गाची लांबी दीड किमीने वाढल्याने खर्चही वाढला आहे. सध्याच्या अंदाजपत्रकानुसार या प्रकल्पाचा खर्च ४२५ कोटी इतका अपेक्षित आहे. यापैकी सिडकोने अर्धा खर्च उचलावा, यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू होते. परंतु, सिडकोने फक्त १२५ कोटी रुपये देण्याची तयारी दर्शविली होती. त्यामुळे महापालिकेसमोर आर्थिक पेच निर्माण झाला होता. परंतु, सिडकोने आता प्रकल्पाच्या एकूण खर्चापैकी पन्नास टक्के खर्च देण्याची तयारी दर्शविली आहे. यासंबंधीच्या ठरावालाही संचालक मंडळाने मान्यता दिल्याने गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेला घणसोली पामबीच मार्गाचा ऐरोलीपर्यंतचा विस्तार दृष्टिपथात आला आहे.

विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी महाराष्ट्र सागरी नियंत्रण विभाग, वन, खारफुटी संवर्धन समिती, पर्यावरण तसेच इकोसेन्सेटिव्ह परवाना आदी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार महापालिकेने निविदासुद्धा काढल्या आहेत. या प्रस्तावित मार्गामुळे ठाणे-बेलापूर मार्गावरील दैनंदिन वाहतूककोंडीला काही प्रमाणात आळा बसणार आहे. तसेच हा मार्ग थेट ऐरोली-मुलुंड पुलाला जोडला जाणार आहे. त्यामुळे प्रगतिपथावर असलेल्या ऐरोली-कटाई मार्गाने पुढे कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, मुरबाड या ठिकाणी सहज जाता येणार आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबई विमानतळाकडे जाण्यासाठीसुद्धा हा पामबीच मार्ग उपयुक्त ठरेल, असा विश्वास महापालिकेने व्यक्त केला आहे.

मार्गाची लांबी दीड किमीने वाढली

सिडकोने २००८-२००९ मध्ये घणसोली नोडसह अर्धवट अवस्थेतील पामबीच मार्गही महापालिकेकडे हस्तांतरित केला. तेव्हापासून हा प्रकल्प ‘जैसे थे’ अवस्थेत पडून आहे. असे असले तरी दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या या प्रकल्पाच्या उभारणीसाठी महापालिकेने कंबर कसली आहे. सुधारित आराखड्यानुसार या मार्गाची लांबी दीड किमीने वाढली आहे. त्यामुळे तो आता ३.४७ किमी लांबीचा झाला आहे. यात खारफुटीच्या क्षेत्रात दोन किमी लांबीचा पूल असणार आहे.

Web Title: Exile of Ghansoli-Airoli Pambeach route ends; CIDCO's readiness to bear 50 percent of the cost left the rift

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.